| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांनी अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जनतेमध्ये अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी फिरण्यामुळे संपर्क येऊन शासकीय सेवा बजावत असताना अनेक शासकीय सेवक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत आणि त्यामुळे अधिकचा धोका निर्माण होत आहे.
तरीही त्यांना वेळीच योग्य आरोग्य सुविधा मिळण्यात अक्षम्य हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे . या बरोबरच शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या अधिपरिचारिका आणि अन्य रुग्णालयीन कर्मचारीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांनाही उपचाराच्या पुरेशा सुविधा मिळत नाहीत. या कारणाने बृहन्मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
कोरोनाशी अहोरात्र लढणाऱ्या या योद्ध्यांचा विचार शासनाने प्राधान्याने करणे आवश्यक आहे. याकरिता शासकीय कामकाज करत असताना कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या शासकीय कर्मचारी, अधिपरिचारिका आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षांची निर्मिती करण्यात यावी. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आरक्षित ठेवण्यात यावेत आणि त्यांना प्राधान्याने आरोग्य सुविधा पुरवण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटनेने केली असल्याची माहिती सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.