| नवी दिल्ली | भारताच्या गाेलंदाजांना आता अधिक आक्रमक करण्यासाठी आपण अधिकच उत्सुक आहोत. यासाठी भारताच्या संघासाठी गाेलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावण्यास आपण सज्ज आहोत, अशी इच्छा पाकिस्तानच्या वेगवान गाेलंदाज शाेएब अख्तरने व्यक्त केली. याशिवाय त्याने भारताच्या गाेलंदाजांवर काैतुकाचा वर्षाव केला. विशेष करून जसप्रीत बूमराह , मोहम्मद शमी यांची त्याने स्तुती केली आहे. सोशल नेटवर्किंग अॅपवर चाहत्यांसाेबत चर्चा करताना त्याने आपले मत मांडले. भारतीय संघासाठी आपण गाेलंदाजी काेच हाेण्यास अधिकच उत्सुक आहोत, असेही त्याने आवर्जून सांगितले.
तसेच यावेळी सचिन तेंडुलकर देव होता हे आपल्याला १९९८ मध्ये भारतात गेलो असता कळाले हे देखील त्याने सांगितले. मी १९९८ मध्ये आलाे हाेताे. या दाैऱ्यात मला भारतीय क्रिकेटमधील सचिनची ख्याती अधिक जवळून पाहता आली. तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणूनच सचिनने आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच चाहत्यांसाठी ताे क्रिकेटचा देव असल्याचेही मानले जात असल्याचे मला कळले, असेही ताे म्हणाला.