नैराश्याने भाजप नेत्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही – जयंत पाटील


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल

मुंबई: देशभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे, परंतु तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मागण्यांचे जे पत्र पाठविले, त्याला अजून उत्तरही आले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या असहकार्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  संवाद साधला. त्या वेळी हातातून सत्ता गेल्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या भाजपच्या नेत्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपालांना दिला आहे. राज्यपाल त्यावर लवकरच निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणीही काम करणार नाही याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.

करोनाचे एवढे मोठे संकट असताना मध्य प्रदेशात भाजपने काँग्रेसचे सरकार पाडले. संकटाच्या काळातही भाजपच्या मंडळींना सरकार पाडण्याचे सुचते, ही दुर्दैवी बाब आहे. जनतेचे काय होईल याचे त्यांना देणेघेणे नाही. यातून भाजप फक्त राजकारणाला महत्त्व देत असल्याचे दिसून आले, असा टोला पाटील यांनी हाणला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *