देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्राचा शत्रू की मित्र – जयंत पाटील

| मुंबई | भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेब थोरात तसेच सेनेचे अनिल परब उपस्थित होते.

नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसं झालं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला. कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार खूप चांगलं काम करतं आहे.  सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक चाचण्या या महाराष्ट्रात होत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयंही उभी करण्यात आली आहेत. गुजरातची अवस्था किती बिकट आहे ते जरा बघा. मला स्पर्धा करण्याची गरज वाटत नाही मात्र महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधली स्थिती अत्यंत वाईट आहे, असाही टोला त्यांनी भाजप ला हाणला. 

महाराष्ट्राचं अनुकरण हे देशातील इतर राज्यंही करू लागली आहेत. अशा काळात फडणवीस यांनी राजकारण करु नये. उलट या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी अजूनही वेळ गेलेली नाही. मजुरांना घरी जाण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पैसे देण्यात आले. आम्ही ज्या ज्या सुविधा मागितल्या त्या आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *