- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल
नवी दिल्ली : भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला आहे. संघनिवड करताना धोनी त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंवर अधिक मेहेरबान असायचा. त्याने डावखुरा फलंदाज सुरेश रैनाची कायम पाठराखण केली, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले.
‘‘प्रत्येक कर्णधाराचे काही आवडते क्रिकेटपटू असतात. ही जुनी परंपरा आहे. धोनीलाही अनेक क्रिकेटपटू आवडायचे. २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा अनुभव आला. त्यावेळी अंतिम संघात निवडीसाठी मधल्या फळीत डावखुरा बॅट्समन सुरेश रैना आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांच्यात स्पर्धा होती. मात्र धोनीने त्याचा अधिकार वापरताना रैनाला झुकते माप दिले. असे अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेत युसुफ चांगलाच फॉर्मात होता. माझीही सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी होत होती. मात्र आमच्या तुलनेत रैनाला अपेक्षित सूर गवसला नव्हता. भारतीय संघात प्रभावी डावखुरा स्पिनर नव्हता. त्यामुळे मला अंतिम संघात स्थान देण्याशिवाय पर्याय नव्हता,’’ असे युवराज म्हणाला.
बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली सर्वोत्कृष्ट कर्णधार होते. माझ्या कारकिर्दीतील ते आवडते कर्णधार होते. ‘‘सौरव (दादा) माझा आवडता कॅप्टन होता. त्याने कायम नवोदित आणि प्रतिभावंत क्रिकेटपटूंना संधी दिली,’’ असे युवराजने सांगितले.