संपादकीय – प्रिय वंदनीय बाबासाहेब..


प्रिय वंदनीय बाबासाहेब..

तुमच्या प्रत्येक जयंतीच्या दिवशी आम्ही या समाजातील आजही उपेक्षित असलेल्या समाज घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. एकीकडे आपली जयंती उत्साहात साजरी होत असताना उपाशीपोटी झोपलेली बकाल अवस्थेतील लोकं पाहिली की आपण दिलेल्या घटनेतील समानतेची तत्व आज असमान राहिल्याची जाणीव होत राहते. बाबासाहेब आज जगावर कोरोनाच्या महामारीचा प्रसंग ओढवू पाहतोय. संपूर्ण जग या महामारीसोबत लढत असताना आपल्या देशातील सर्व यंत्रणाही पूर्ण ताकतीने या महामारीसोबत लढत आहेत. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आज देशभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आलं आहे. दळनवळण, व्यापार, उद्योग, रस्ते, अगदी सामाजिक जनजीवन बंद करण्यात आलं आहे. हे लॉक डॉऊन सगळ्या जगासाठी भल्याचं असल्याच्या भावनेनं लॉकडाऊनला प्रत्येक जण आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून आज आपल्या घरी बसून आहे. एकीकडे लॉकडॉऊन मजेत जावा म्हणून मनोरंजन, खाणंपाणं, इन डोअर गेम यांचं प्लॅनिंग सुरू आहे. तर दुसरीकडे भटकंती करणारे, हातावर पोट असणारे, रस्त्यासाठी रस्त्यावर दगडफोडून जगणारे, भंगार वेचणारे, कामासाठी गाव घर सोडून दूरगावी राहणारे अनेक लोक मात्र या लॉक डॉऊनच्या प्रत्येक दिवशी पोट कसं भरावं या चिंतेत असलेले आम्ही पाहत आहोत.

आज तुमच्या जयंती दिवशी अशाच शेतात अडकून पडलेल्या हिंगोलीहुन जालना जिल्ह्यात दगड फोडण्यासाठी आलेल्या काही कुटूंबाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही पोहचलो. सगळे कामगार कायदे धाब्यावर बसवून कामासाठी आणलेल्या मजुरांना उपासमारीच्या दलदलीत टाकून फरार झालेल्या त्यांच्या गुत्तेदाराच्या असंवेदनशीलतेची मनातून चीड आली. गेल्या 17 दिवसापासून दोन पोते तांदूळ खाऊन 60 माणस कशी जगली असतील ? हा प्रश्न आज आपल्या समानतेच्या शिकवणीशी विसंगत होताना दिसला. असे पोट भरण्यासाठी घराबाहेर पडलेले अनेक कुटूंब देशभरात रस्त्याच्या कडेला अडकली आहेत. आपल्यासकट सगळ्यांच महापुरुषांचा उदो उदो करणाऱ्या सगळ्यांच अनुयायांनी जर ठरवलं तर यापैकी कुणी उपाशी मरणार नाही याबद्दल नक्कीच विश्वास वाटतो. आज आपल्या जयंतीच्या औचित्यानं अशा नडलेल्या एकूण 110 कुटूंबाना माणूसपणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही करून आलोय.

तुम्ही अगदी प्रत्येकाचा विचार केला होता. अमीर उमरावापासून ते गरीब फुटपाथवर झोपणाऱ्या प्रत्येकाला माणूस म्हणून तितक्याच खंबीरपणानं जगता यावं, हा उद्देश ठेऊन तुम्ही लिहलेली घटनेतील कलमं प्रत्येकाच्या आयुष्यात नवसंजीवनी देणारी होती. सत्तर वर्षाहून अधिक काळ होऊन गेला साहेब तुम्ही दिलेल्या त्या प्रत्येक विचाराला… त्याच विचारातून कित्येकांच्या जगण्याला अर्थ मिळाला साहेब..! अगदी प्रत्येकाला माणूस बनवलंत तुम्ही…!

तुमच्या एका जयंतीच्या दिवशी भीक मागणाऱ्या पोरांसाठी आम्ही शाळा सुरू केली होती. कायद्याने ( घटनेनं) प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे हे सांगून गेलात तुम्ही; कित्येक वर्षांपूर्वी..! पण आज अशी अगणित मुलं आहेत जी पोटासाठी त्यांचं बालपण विसरून जबाबदारीनं रस्त्यारस्त्यावर त्यांचं पोटं शोधत हिंडताना दिसतात. अशा पोटासाठी तडफडणाऱ्या भारतातल्या करोडो पोरांच्या शिक्षणासाठी असंख्य कायदे निघूनही आजही अशी असंख्य मुलं शिक्षणाच्या खेळात बाद झालेली पाहून तुम्हाला काय वाटलं असतं हा विचाराचं वेदनादायी वाटयला लागतो..! कदाचित तुम्ही पोटतिडकीने लिहलेल्या त्या प्रत्येक कलमांची जबाबदारी स्वीकारणारे आमचे खांदे तेवढे मजबूत नसावेत म्हणून तुमच्या पश्चात शिक्षणाच्या धारेपासून आजही काही लोक अस्पृश्य आहेत..!

बाबासाहेब, आपण अठरा तास अभ्यास करत होता. अनेक ग्रंथ आपण मुखतगद केले होते. वाचनाच्या प्रचंड व्यासंगातुन जगातल्या प्रत्येक ज्ञानाकक्षेला आपण गवसणी घातली होती. आपण प्रत्येक घटकांबद्दलचा केलेला विचार सविधांनातल्या प्रत्येक पानावर पाहून आपल्या त्या व्यासंगाची प्रचिती आजही येत असते. कामगार, कष्टकरी, महिला, आदिवासी, निराश्रित, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, पुढारी, कारभारी, अधिकारी याप्रमाणेच वने, जंगले, पाणी, निसर्ग, पशु पक्षी, पर्यावरण, प्रदूषण या मानवेतर बाबीसबंधीसुद्धा विचार करूनच आपण घटना लिहली, या मागे आपण केलेल अमर्याद वाचन..! प्रत्येक सुवाचकामध्ये जग बद्दलवण्याची धमक असते हा आपण दिलेला विचार घेऊन मागच्या वर्षीच्या जयंतीला वाचन प्रेरणेसाठी आम्ही वाचनालय सुरू केलं.

2018 मध्ये आपल्या क्रांतिकारी विचारांचे बीज समाजमनात रुजवण्यासाठी 11 ठिकाणी व्याख्यानेही दिली. या सगळ्या कृतीतून तुमच्या जयंतीला तुमचे विचार जगण्याचा सातत्याने एक प्रयत्न आम्ही करत आहोत. उद्देश एकच की जे जग प्रत्येकसाठी आहे, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे… माणुसपणातून प्रत्येक माणूस उभा केला तरच प्रत्येकाला तो अधिकार मिळेल.. त्या तुमच्या माणूसपणाच्या जाणिवा आजही जिवंत ठेवण्यासाठीच ही धडपड.!

आज संपूर्ण मानव जातच संकटात आहे.. माणसाला महामारी आणि भूकमारीच्या संकटातून बाहेर करण्यासाठी तुमच्या मानवतेच्या विचाराला शिरसावंद्य माणणाऱ्या त्या प्रत्येक अनुयायांची आज गरज आहे… बाबासाहेब आज तुमची गरज आहे…!

आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!

दादासाहेब थेटे ( वरिष्ठ संपादक)


1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *