संपादकीय : जगणं कठीण.. मरण मात्र सोपे झालंय..!

किती निरागस होता त्याचा चेहरा.. आपल्यातलाच वाटायचा ना..! त्याचं हसणं, बोलणं, चालणं; त्याच सबंध जगणंच किती साधं होतं.. सर्वसामान्यांचं प्रतिबिंब दिसायचं त्याच्यात..! त्याचे डोळे कसे पाणीदार होते, किती सहज बोलायचे ते.. बऱ्याच दिवसांपासून तेच डोळे अनेकदा भरून आले असतील. काहीतरी सांगत असतील ते; पण त्या डोळ्यांच्या वेदना ऐकणारे कान आणि त्याचं हसरं दुःख न ओळखणाऱ्या त्याच्या भोवतीच्या असंख्य नजरांना त्याची घुसमट बहूदा समजलीच नसावी.

“आयुष्य सुंदर आहे..!” असं सांगणाऱ्या अनेक काव्य- कथा मी ऐकल्या नि वाचल्या सुद्धा. पण तेच आयुष्य किती क्षणभंगुर आणि नश्वर आहे हे दाखवणाऱ्या अनेक घटना देखील मी अनुभवल्या आहेत. कितीतरी लक्ष योनी फिरून आल्यानंतर माणसाचा जन्म भेटतो असं आपल्याकडे बोलल जातं. जर माणूस जन्म एवढा महागडा असेल तर मग… आत्महत्या का..?

या जगाच्या पाठीवर अनंत जीवांचे अस्तित्व आहे. पण आजवर कधी कुणा कुत्र्याने फाशी घेतली; वा कुणा बैलाने विहीरीत उडी मारून जीव दिला; किंवा कुणा हत्तीने खडकावर सोंड मारून-मारुन मृत्यूला कवटाळल्याची घटना मी पाहिली नाही; ना ऐकली..! आजवर माणूस सोडून कोणत्याही प्राण्यांने आत्महत्या केल्याची घटना घडलेली ऐकीवात नाही. मग माणूसच का..?

माणूस; जो विचार करू शकतो, जो समूहाने राहतो… जो निर्माण आणि विध्वंसही करू शकतो. जो शरीराची गरज मानू शकतो आणि आत्म्याचंही अस्तित्व जाणू शकतो, तो प्राणी म्हणजे माणूस… जेवढा समाजशील; तेवढाच स्वतःमध्ये गुरफटलेला आत्मकेंद्री जीव..!

संपत्ती पासून ते प्रसिद्धी- प्रतिष्ठा ह्या बाह्य गोष्टींचा त्याच्या मनावर नित्य परिणाम होत असतो. प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ, द्वेष, आसूया, तिरस्कार, मान, अपमान अशा अनेक भाव भावनामुळे इतर प्राण्याहून तो वेगळा भासतो. ह्याच भाव भावना माणसाला जगण्यावर प्रेम करायलाही शिकवतात आणि मरायलाही प्रवृत्त करतात. मग त्या भाव भावनाच्या जाळ्यात अडकून मृत्यूला आपलंसं करणारे गुरू पदावर जाऊन पोहचलेले भय्यु महाराज असोत; की मग करोडो तरुणांचा आयकॉन बनलेला सुशांत सिंह राजपूत..!

प्रत्येक माणसाची जगण्यासाठी धडपड सुरू असते.माणसाला स्वतःच्या जीवापेक्षा मोठं काहीच वाटतं नाही. तरीही अशी कोणती परिस्थिती माणसावर येते जिथे मृत्यू शिवाय दुसर काहीच दिसत नाही. मेल्यानंतर सगळे म्हणतात “तू असं करायला नको होतं.” पण मरणाच्या खोल समुद्रात गटंगळ्या खात असताना त्याला कुणी हात देत नाही तेव्हा त्यानं काय करावं ? हा ही प्रश्न मनाला छळतो. तो अपयशी झाला, का नैराश्यात गेला किंवा प्रेमभंगाच दुःख त्याला छळत होतं, हे न बोलता जाणून घेणारा एखादा मित्र वा नातेवाईक त्याला मिळवता आला नाही, कदाचित हेही त्याच्या आयुष्यातलं पराभवाचं कारण असू शकत.

तो मोठा माणूस झाला, तो जगापेक्षा वेगळा होता म्हणून त्याचा वैफल्याचा चेहरा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना दिसला नसेल असंही अनेकांना वाटत असेल. कधी कधी खूप वेगळं असणंही घात करून जातं. इतरांनी असं वेगळं समजण हेच काहींना या अफाट जगात एकटं पाडुन जातं. त्या एकटेपणात एवढी घुसमट होत असते की, ते त्यांच्या व्यथा कोणाला बोलुही शकत नाहीत ना सांगूही शकत..! जसं अनंत जीव पोटात पाळणाऱ्या समुद्राच्या खारटपणाचा शोक कधी मासे करत नाहीत. ना लाखो दगड, माती आणि वनस्पतीना खांद्यावर खेळवणाऱ्या डोंगराच्या आंतरिक वेदना झाडं कधी पुसत नाही. माणसाचही तसंच होतं ना.. उंचीवर पोहचलेल्या माणसांचा अस्वस्थपणा त्याच्या सोबत राहणाऱ्यालाही कळत नाही.. तो अस्वस्थःपणा मृत्यूच्या फासानेच ही लोक मोकळा करतात..! अशावेळी गरज असते ती त्या फासाला सैल करणाऱ्या आपुलकीच्या, प्रेमाच्या हातांची..!

याउलट दरिद्री, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, आर्थिक कुचंबणा, अवास्तव अपेक्षांचं ओझं, मान अपमानाचे सामजिक मानके आणि यामध्येही असणारी स्वमग्नता, प्रतिष्ठेचा बागुलबुवा या कारणामुळेही अनेक मध्यमवर्गीय व सामान्य कुटूंबातील अनेकजन या देशात दरवर्षी आत्महत्या करत असतात.  पण सामाजिक मने तेव्हा ढवळून निघतात जेव्हा काही चेहरे “छिचोरे” होऊन कॉलेजात वावरलेली दिसतात. “धोनी” होऊन गल्ली बोळात स्वतः मिरलेली असतात. नैराश्यात गुरफटलेल्या अनेक हरलेल्या लोकांना ज्यांनी विजयाचा मार्ग दाखवून विचारलेलं असत, ‘काय पो छे’..! प्रत्येक प्रेमीला प्रेमाचा “पवित्र रिश्ता” शिकवून प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हवा असलेला “मानव” ज्याच्यात दिसतो असा सुशांत हे सूंदर जग किती कुरूप आहे असं सांगून जातो तेव्हा मनापासून वेदना होतात..! 

सुशांत तू शेवटी सिद्ध केलंस… या जगात सल्ला देणं खूप सोपं आहे मित्रा… सहन करणं कठीण..!

 – दादासाहेब थेटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, दैनिक लोकशक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *