संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या पोलिसांकडे आजही समाज अपेक्षेने, आधार म्हणून बघतो. त्यांच्यावरच अलीकडे कुठेकुठे जीवघेणे हल्ले होऊ लागलेत. स्वतःचा जीव वाचवायची वेळ खुद्द पोलिसांवर येणे ही महाभयंकर स्थिती आहे.

आठवतेय का? ‘अपराध परदेशात’ अखलाखच्या केसची चौकशी करणारे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांचीही अशाच रक्तपिपासू, बेभान झुंडीने मॉबलिंचिंग करत अत्यंत क्रूर हत्या केली होती. त्यावेळी देखील कायद्याचे रक्षक असलेले पोलिस खाते गप्प बसले होते.

एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची हत्या होऊन गेल्यावर आरोपी माहिती असूनही, आरोपीला अटक करण्यासारखी कारवाई तातडीने होत नसेल तर झेंडे हातात घेतलेल्या धर्मांध, मदमस्त, उन्मादी झुंडी आणखी रक्तपिपासू बनणार! दस्तुरखुद्द पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येच्या केसमधल्या आरोपीला अवघ्या काही दिवसांत जामीन मिळतो. तो जेलबाहेर येताच हार, फुले घालून त्याचे स्वागत होते! हे सगळे काय आहे? हे अराजकाला दिलेले राजकीय प्रोत्साहन तर नव्हते ना? दूरवाटेने झुंडबळीचे सोयीस्कर समर्थन करणाऱ्या औलादी जन्माला आल्यात या देशात. यात कधी सत्तेतले तर कधी विरोधक असतात. सगळे सामील होत आलेत कधी ना कधी! या सगळ्याला राजमान्यता मिळाल्यासारखे वातावरण आहे सध्याचे. उघडपणाने समोर येऊन माणसे मारणाऱ्या क्रूर हिंसेचे थेट समर्थन करणारे राजकीय पक्ष प्रवक्ते, विशिष्ट ‘कार्यकर्ते’ आहेत, आताच्या जमान्यात तसे ते असणारच म्हणा!

मात्र लोकांच्या हितासाठी सत्तेला प्रश्न विचारायचे सोडून समाजाला जात-धर्माच्या चिखलात ओढणारे न्यूज हाउसेस आणि सतत तोच चिखल चिवडत राहणारे आणि तरीही स्वतःला पत्रकार वगैरे म्हणवणारे निर्लज्ज पत्रकार या देशात मौजूद आहेत. तेच खरे ‘आयडिया ऑफ इंडिया’चे हत्यारे आहेत! हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई नाही मरत, मरतात ती माणसे असतात, हेच सारे सारे धर्मांध विसरुन गेलेत..

विकृत ट्रोलरना जिथे वरिष्ठ राजकीय नेते ट्विटरवर फॉलो करतात. भयाची पेरणी करत सत्तेचे पीक घेताना इथली संबंध व्यवस्थाच ओलिस ठेवली जाते.. अन्न, वस्र, निवारा, पाणी, हवा, आरोग्य, रोजगार यापेक्षा धर्म जेव्हा मोठा होतो…

विषाणूलादेखील जिथे धर्म बहाल केला जातो,

गुंडापुंडांचा निवडणुकीत जय होतो. विधानसभा, लोकसभेत सदस्य, मंत्री म्हणून ते टेचात जाऊन बसतात… कायदा-सुव्यवस्था बघणारे पोलिसदादा त्यांना सैल्यूट करत असतात… आणि आमच्या लोकशाहीतले मतदार उदार होऊन भावनाविवशतेत मतदान करतात…

हे सगळे बदलायला-
राम
कृष्ण
बुद्ध
अल्लाह
येशू
नानक
शिवाजी
फुले
आंबेडकर
शाहू
असे कोणीतरी जन्म घेतील, अशी आमची भाबडी जनता वाट बघत बसते….
बस.. 
इतकेच पुरेसे आहे!

हेच हेच ते अराजक आहे, अराजक म्हणजे वेगळे काही नसते.

यादवांमध्ये यादवी माजली आणि त्यातच द्वारका नगरी बुडाली होती म्हणतात… हा देश नष्ट करायला, बाहेरच्या शत्रूची आम्हांला अजिबात गरज नाही. आधुनिक आर्यावर्तातले अराजकही पुरेसे आहे.

भाऊसाहेब चासकर ( अतिथी संपादक)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *