अखेर सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान पोहचले लडाखला..!

| नवी दिल्ली | भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणा-या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक शुक्रवारी लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौ-यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित होते.

निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणा-या लष्करी अधिका-यांची मोदींनी भेट घेतली. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिका-यांनी मोदींना दिली. निमू येथे तैनात असणा-या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला.

भारत चीनच्या सीमेवरील कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या लडाख दौ-याच्या माध्यमातून दिला आहे. इंच इंच पुढे वाढण्याची चीनची कुटील चाल दक्षिण चीन सागरात यशस्वी होऊ शकते, मात्र भारतासमोर त्याची डाळ शिजणार नाही, असा स्पष्ट संदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिल्याचे बोलले जात आहे. भारत चीनला सीमेवर मागे हटवण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचेही बोलले जात आहे.

एकीकडे चीन आपल्या सैनिकांची संख्या ही लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर संकटाच्या या काळात भारतीय लष्करासोबत आपण नाही, तर संपूर्ण देश उभा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चीनसोबतचा हा तणावाचा काळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता असून आपल्याला एका दीर्घ लढाईसाठी तयार राहावे लागणार आहे, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. भारत ड्रॅगनसोबत चर्चा करण्यासाठीही तयार आहे, मात्र कोणत्याही आक्रमक कारवाईचे सडेतोड उत्तर दिले जाईल, असेही यातून त्यांनी दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *