त्यावेळी तोंडाला कुलूप लावले, आता आरोळ्या का ठोकता..?
माजी आमदार राहुल जगताप यांची आमदार पाचपुतेंवर घणाघाती टीका..!| अहमदनगर |  कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. त्यावेळी तोंडाला कुलूप लावले आणि आता नाहक आरोळ्या कशाला ठोकता असा सवाल माजी आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला.

राहुल जगतात यांनी बोलताना सांगितले की कुकडीचे रोटेशन सुरू झाल्यानंतर १३२ नंबर वितरिकेचे आवर्तन सुरू होणे गरजेचे असताना तसे झाले नाही. १३२ ला उशिरा रोटेशन सुटल्याने सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्याचवेळी चुकीच्या नियोजनामुळे नको तेथे पाण्याचा गैरवापर झाल्याने कोणत्याही पाझर तलावात पाणी सोडले नाही.  विसापूरचे आवर्तन सुरू करून महिन्याचा वर कालावधी गेला तरी विसापूर तलावात कुकडीतून खाली जाणाऱ्या पाण्याचा थेंबभर पाणी सोडले नाही. पहिल्याच पाण्यातून विसापूरचे आवर्तन केल्याने पुढील आवर्तन विसापूर तलावातून करणार कसे असा सवाल राहुल जगताप यांनी विचारला.

घोडेगाव, भावडी, पारगाव, वडाळी, लेंडी नाला या पाझर तलावांमध्येही पाणी सोडण्यात आले नाही. रोटेशन चालू असताना सर्वांना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले नाही आणि आता सहानुभूती साठी पुणेकरांशी खडाजंगी केल्याचे नाटक पाचपुते करत आहे असा आरोप राहुल जगताप यांनी केला.

राहुल जगताप यांनी बोलताना सांगितले की मीही विरोधी पक्षाचा आमदार होतो त्यावेळी अशी नाटकबाजी केली नाही. शेजारचे पालकमंत्री असताना त्यांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाण्याचे नियोजन करून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला. आज तर पाण्याची परिस्थिती चांगली असताना शेतीला पाणी देता येत नसेल तर याला जबाबदार कोण असा सवाल राहुल जगताप यांनी विचारला. जर काही चांगले झाले तर माझ्यामुळे झाले आणि वाईट झाले तर दुसऱ्यामुळे झाले ही वृत्ती पाचपुते यांनी सोडून झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी असे राहुल जगताप यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *