![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/20200509_204234.jpg?resize=432%2C421&ssl=1)
| मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ही मोफत बस सेवा येत्या १८ मे पर्यंतच असेल. एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी काही अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात येईल, असंही अनिल परब म्हणाले. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल.
त्याबाबत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिलेली माहिती :
१. सोशल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी यामुळे एका बसमध्ये साधारणपणे २१ ते २२ लोक बसू शकतात. त्यामुळे जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लीडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावीत. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.
२. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवार पासून सुरु होईल. ऑनलाइन अर्ज करतेवेळी आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.
३. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बस मध्ये चढतेवेळी हात सनिट्झरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.
४. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.
५. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीयेत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.
६. कंटेन्टेनमेन्ट झोन मधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही,ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे.
गावी