अबब : सोने ५० हजार पार..!

| नवी दिल्ली | एकीकडे लॉकडाऊनमधून दिलासा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रम नोंदवत असताना सोन्याच्या किंमतींनीही विक्रमी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. आज सोन्याच्या दराने ५० हजाराचा आकडा पार केला असून दिल्लीमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ५०४०५ रुपयांवर गेली आहे. कोरोनामुळे जगाने धसका घेतल्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या किंमतीमध्ये अस्थिरता दिसू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेसह अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग पत्करला असून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देणारे एकमेव सोने हाच पर्याय आहे. यामुळे दिल्लीमध्ये काही दिवसांत सोन्याचा दर ५२ हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सोन्यातील नफेखोरी अशीच सुरु राहिल्यास सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुधवारी ऑगस्टमधील वायदा बाजारात सोन्याची किंमत ४८,५८९ झाली होती.

अँजेल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोन्याची किंमत पुढील एक-दोन महिन्यांत ५१ हजाराच्या आसपास जाईल. तर मोतिलाल ओस्वालच्या किशोर नर्ने यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांत सोन्याच्या किंमती ६५ ते ६८ हजारावर जाण्याची शक्यता आहे. एवढी मोठी वाढ ही भारतीय रुपया आणि डॉलरच्या किंमतीवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *