गोल्डन मित्र मंडळ पोहचले सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी पाड्यात..!
जीवनावश्यक वस्तूंचे आदिवासी बांधवांना वाटप..!| कल्याण | कोरोना विषाणू आपत्तीच्या या भीषण प्रसंगी रोजंदारीने काम करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांची सर्वच कामे बंद असल्याने मोठी कुचंबणा झाली आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील भट्टीचीवाडी व आयण्याचीवाडी ही आदिवासी गावे त्यातीलच..! या गावांमध्ये कोणत्याही स्वयंसेवी संस्थांची मदत अद्यापपर्यन्त पोहोचली नव्हती.

याची माहिती झाल्यावर तत्परतेने कल्याण तालुक्यातील नवगाव (बापसई) येथील स्वर्गीय गुरुनाथदादा टेंभे यांच्या प्रेरणेने विधायक कामे करणाऱ्या गोल्डन मित्र मंडळाच्या सदस्यांनी रुपये ४० हजार किमतीचे जीवनावश्यक साहित्य या गावांमध्ये वाटण्याचा संंकल्प सोडला. त्यातून सगळ्यांनी एकत्र येऊन तांदूळ, डाळ, खाद्यतेल, साखर, चहापावडर, बिस्कीट, टूथपेस्ट, मसाला, हळद, मीठ, रवा, कांदे, बटाटे, वाटाणे, सोयाबीन वडे, साबण, खोबरेल तेल आदी वस्तूंचे कीट बनवून भट्टीचीवाडी व आयण्याचीवाडी येथील ६० कुटुंबाना वितरित केले.

तसेच एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये २५०००/- चा धनादेश देखील सुपूर्द केला आहे. मंडळाने यापूर्वी देखील कारगिल युद्ध मदत निधी, गुजरात भूकंप मदत निधी, पूरग्रस्त मदतनिधी, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजन, दारूबंदी प्रबोधन, बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक अनेक समाजसेवी विधायक कामे केली आहेत.

या मोलाच्या कार्यात मंडळाचे पदाधिकारी गणेश टेंभे, संदेश टेंभे, गजानन टेंभे, रंजना कदम, रमेश टेंभे, दिलीप टेंभे, रविंद्र कोर, शरद टेंभे, अमोल टेंभे, सुनिल कोर, राजेश टेंभे, संजय टेंभे यांचा सिंहाचा वाटा आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *