उत्कृष्ट निर्णय : मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय राहणार उभे..!

| मुंबई | कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. लाखो लोकांना आपले प्राण तर गमवावे लागलेच पण अनेक देशांच्या अर्थव्यवस्था व आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनासह साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच हजार बेडचे हे रुग्णालय मुलुंड येथे उभारण्यात येण्यात असून त्यासाठी लागणारा सर्व निधी मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यात विशेष करून राज्यातील साथीचे आजार व उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. या सगळ्या चर्चेतून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना आकाराला आली. कोरोनाची साथ आज जशी आली तशी भविष्यात आणखीही कुठली साथ आलीच तर त्याचा सक्षमपणे सामना करण्यास महाराष्ट्र तयार असला पाहिजे, हा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असून राज्याचा विचार करता मुंबईत असे सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारणे हे सर्वार्थाने योग्य ठरणारे आहे. यातूनच मुलुंड येथे महापालिकेचे जगातील सर्वात मोठे म्हणजे जवळपास पाच हजार बेडचे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात साथरोग आजाराबरोबर मल्टीस्पेशालीटीची तसेच साथरोग संशोधनापासून तज्ज्ञांसाठी व्यासपीठ उभारले जाणार आहे.

दरम्यान, जवळपास चार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प होऊ शकतो असे काही ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मुंबई महापालिकेचे आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४२६० कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा तो १५ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी पालिकेचे आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४१५१ कोटींचा होता. आता आगामी अर्थसंकल्पात मुलुंडच्या पाच हजार बेडच्या साथरोग रुग्णालयासाठी स्वतंत्र तरतूद केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *