आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग टाळण्यासाठी कॉन्टॅक्टलेस उपचारांवर भर देण्याची गरज – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या वेबिनार मधील मतप्रवाह

| कल्याण | करोना हा अतिसंसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका मोठा आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने संपर्काविना मशीन्सद्वारे कोविड-१९ च्या रुग्णांवर कशा प्रकारे ‘कॉन्टॅक्टलेस’ उपचार करता येतील, याबाबत विचार झाला पाहिजे, असे मत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित एका विशेष वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आले. कोविड-१९ चा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना मानवी जीव वाचवतानाच डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनाही सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

त्यामुळेच त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन जास्तीत जास्त कोविड रुग्णांना आरोग्यसुविधा कशी देता येईल, यावर या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली. सुरक्षित अंतर राखून आयसीयू पेशंट्सची पाहणी करणे, त्यासाठी प्रसंगी व्हिडिओ मॉनिटरिंगचा पर्याय निवडणे, स्पर्शविरहित क्लिनिक्सची निर्मिती करणे, रुग्ण तपासणीसाठी रोबोट्सचा वापर करणे. यासारख्या अनेक पर्यायांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली मतं मांडली. कोविड-१९ चा प्रसार वेगाने होत असतानाच  ‘टेक्नोलॉजीचा सहज वापर करून रुग्णांचा जीव कसा वाचवावा?’ यावर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. मुंबई कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मुफझ्झल लकडावाला (बेरियाट्रीक सर्जन), डॉ. नीता वर्टी (स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ओबेस्ट्रेशियन) यांच्यासह थेट अमेरिकेहून डॉ. अमित शर्मा (गेइथनर कॉमनवेल्थ स्कूल ऑफ मेडिसिन, क्लिनिकल असोसिएट, इन्फेक्शिअस डिसिजेस, गेइथनर हेल्थ सिस्टीम्स, यूएसए) यांचा सहभाग होता. त्यांच्याशिवाय कल्याण-डोंबिवली कोविड टास्क फोर्समधील डॉक्टर्स आणि कल्याण, डोंबिवलीत काम करणारे इतर डॉक्टर्स देखील यात सहभागी झाले होते. या वेबिनारमध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत असलेल्या क्षेत्रातील मृत्यूदर आणि रोगपरिस्थिती कशी आटोक्यात आणावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

यात खालील काही मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली : 

• सुरक्षित अंतर राखून आयसीयू पेशंट्सची पाहाणी करणे. त्यासाठी प्रसंगी व्हिडिओ मॉनिटरिंगचा पर्याय निवडणे
• स्पर्शविरहित क्लिनिक्सची निर्मिती
• रूग्ण तपासणीसाठी रोबोट्सचा वापर
• मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी ऑक्सिजनचा वेळेत वापर
• आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, म्हणजेच संपूर्णपणे मानवविरहित मशीन्सचा वापर करून रुग्णांची तपासणी
• मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करून संपर्कामुळे होणारा फैलाव रोखणे
• रुग्णाला वेळच्या वेळी रेमडेसिव्हिअर आणि फेविपेराविर यांसारखी अँटी व्हायरल औषधे देणे
• प्लाज्मा थेरपी आणि स्टिरॉइड्सचा सुयोग्य वापर
• प्रेग्नन्सी दरम्यान देखील अँन्टी-कोग्युलंट्स, जसे की LMWH म्हणजेच लो मोडिक्युलर वेट हापरिनचा वापर
• आरटी – पीसीआर स्वॅब टेस्टिंगचा वापर प्रेग्नन्सीच्या ३७व्या आठवड्यापर्यंत करता येणे.
• कायद्यानुसार कोविड-१९ वरील अँटी व्हायरल औषधे प्रेग्नन्सीच्या पहिल्या तिमाहीपर्यंत देता यावीत, यासाठी प्रयत्न करणे
• स्तनपान करताना कोविड-१९ व्हायरसचे आईकडून मुलाकडे कोणतेही हस्तांतरण होत नाही.
• मलेरियावर जगभरात देण्यात येणारे ‘HCQS प्रोफिलेक्सीस’ हे औषध चालत असेल तर वापरण्यास हरकत नाही.
• डॉक्टर्स आणि त्यांना सहाय्य करणारा पॅरामेडिकल स्टाफ यांच्य़ा सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे    
या वेबिनारचे संचालन कल्याण-डोंबिवली कोविड टास्क फोर्समधील डॉ. विक्रम जैन आणि कल्याण डॉक्टर्स आर्मीचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांतर्गत या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमधील चर्चेमुळे कोविड-१९ रोगाशी दोन हात करणाऱ्या कल्याण-डोंबिवली कोविड टास्क फोर्समधील डॉक्टरांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *