मुंबई सह कोकणात मुसळधार पाऊस..!

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला पाऊस आज चांगलीच बरसणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. मुंबई शहर, मध्यवर्ती भागात (७० मिमी) जोरदार पाऊस पडला असून इतर भागात हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली. पुढच्या २४ तासात कोकण, मुंबई काही भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

मुंबईत सर्वदूर मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज हवामान विभागाने मुंबई ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. दक्षिण मुंबई म्हणजेच कुलाबा ते भायखळा, मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

आयएमडीने मुंबईला व किनारपट्टीवर २४ ते ४८ तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ३ जुलै आणि ४ जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे.

हवामान विभागाकडून रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये ४ जुलैला तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायगडमध्येही पाऊस असाच हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा इथं ३, ४ आणि ५ जुलै रोजी चांगलाच मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गुजरात आणि लगतच्या अरबी समुद्रातील हवामानातील बदलांमुळे राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावले असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड या तालुक्यात रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केलं आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात सकाळपासून पावसाला जोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *