व्यक्ती वेध – आमदार राजेश राठोड..!

कॉंग्रेसमधून विधानपरिषदेसाठी अनेक दिग्गज इच्छुक होते. नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा कॉंग्रेस मध्ये होती. मात्र कॉंग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत राजेश राठोड यांनी रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे राजेश राठोड चर्चेत आले आहेत.. तर कोण आहेत हे राजेश राठोड…!

विधान परिषदेचे माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे राजेश राठोड हे चिरंजीव आहेत. धोंडीराम राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. राजेश यांचे वडील धोंडिराम राठोड हे २००२ ते २००८ या कालावधीत राज्यपाल नियुक्त आमदार होते; तसेच त्यांनी पक्षाचे सरचिटणीस, जनरल सेक्रेटरी, भटक्या व विमुक्त जाती विभाग राज्य अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य; तसेच सात राज्यांत विधानसभा पक्ष पक्षीनिरीक्षक म्हणून देखील काम केले आहे.

तर  राजेश राठोड हे जिल्हा परिषदेत तीन वेळा निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतिपदावरही ते होते; तसेच त्यांनी एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत.   महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर काम केलेल्या राजेश राठोड यांच्याकडे सध्या काँग्रेसचे कोणतेही पद नाही. तरिही मंठा तालुक्यात जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते सचिव आहेत. या संस्थेअंतर्गत विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय सुरू आहेत. शिक्षण संस्था आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून त्यांचा मंठा आणि परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजाची दांडगा जनसंपर्क आहे. पुणे विद्यापीठतुन त्यांनी एमएड ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून त्यांना संधी मिळाली नाही. इच्छुक असूनही ऐनवेळी कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली गेली होती. आता काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी देत न्याय दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच राठोड यांच्या रूपाने काँग्रेसने बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व दिल्याचे बोलले जाते. राठोड कुटुंब हे काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *