तुमचं ऑपरेशन लोटस तर; तर आमचे ऑपरेशन लोटांगण असेल – संजय राऊत यांनी डागली तोफ..!

| मुंबई | सरकार पाडणार.. सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; असं आव्हानच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला राज्यातलं सरकार पाडण्याचं थेट आव्हानच दिलं. काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असं काही तरी सरकार पडणार असल्याचं बोलत असतात. बरं त्यांचा हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक नाहीये. त्यांनी जर मुहूर्त काढला असेल तर आमचीही गटारी आहेच की. आम्ही कोकणातील लोक आहोत, गटारी कशी असते दाखवून देऊ. हे महाराष्ट्र आहे. हे काही गोवा आणि मध्यप्रदेश नाही. तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स इथे चालणार नाही. तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू. मग रोज सतत पाच वर्षे तुम्हाला मुहूर्तच काढावा लागेल, असं सांगतानाच रोज रोज सरकार पडणार सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचं ना? मग पाडाच. हे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टंच असेल तर त्याला कोण काय करणार? असं राऊत म्हणाले.
एखाद्या राज्यात सरकार नाही म्हणून अस्वस्थ होण्याचं कारण काय? जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा विरोधाचा सूरही असावा लागतो. विरोधक असेल तर सत्ता चालवण्यात मजा असते. पण सत्ता आणि पैशाचा माज असता कामा नये. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भ्रमातून बाहेर पडा. प्रत्येकाच्या पायाखाली सतरंजी असते आणि कुणाला तरी ही सतरंजी खेचता येत असते, हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच लोकशाही अस्थिर करू पाहणाऱ्यांना आता आणीबाणीवर बोलण्याचा आणि प्रवचन झोडण्याचा अधिकार राहिला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे लोक कोणतंही सरकार पाडू शकतात. उद्या अमेरिका आणि इंग्लंडमधील सरकारही पाडतील, असा चिमटा काढतानाच अनेक हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची राज्ये लयाला गेली. रावणाचं राज्यही अमर होतं. पण तोही उताणा पडला. त्यामुळे राज्य अस्थिर करण्याचा अजेंडा राबवू नका. राजकारण अस्थिर आणि चंचल असतं हे लक्षात घ्या. आकड्यांचा खेळ खेळू नका. आम्ही राज्य वाचवण्याचं काम करत आहोत. तुम्ही राज्य बिघडवू नका. देशावर मोठं संकट आलं आहे. शंभर वर्षात आलं नव्हतं एवढं मोठं करोनाचं संकट आहे. त्यामुळे देश आणि राज्याला या संकटातून वाचवण्यासाठी पुढे या. एकदा का या करोनाच्या संकटातून आपण बाहेर पडलो तर आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ. मग सरकार पाडण्याचा खेळ खुशाल खेळत बसा. पण आता ही वेळ नाही. नक्कीच नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राजभवनावर वाढलेल्या कोरोना रुग्ण आणि अंतिम वर्षाची परिक्षा यावर तुलनात्मक आणि खोचक टिपणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *