लॉकडाऊन वाढविणार..? वाचा काय म्हणाले आज उध्दव ठाकरे..!

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करत आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का? याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन उठणार नाही. मात्र सर्व असंच सुरू राहणार नसल्याचंही ते म्हणाले. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी हळूहळू सुरु करत आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजणे चुकीचं आहे. असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच डगमगून जाऊ नका असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधत आहेत.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, कोरोना हा आ वासून उभा आहे. यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं सरकार काळजीवाहू सरकार नाही मात्र महाराष्ट्राला तुमची काळजी आहे. तुमच्यापाठी सरकार आहे. मात्र धोका संपलेला नाही. योग्य ती काळजी घ्या. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सर्व काही सुरू झालं म्हणजे संकट टळलं असं नाही. योग्य ती काळजी घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या काळातही १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात यशस्वी झालो आहोत. आता प्रधानमंत्री गरीब योजनेतून धान्य देण्याची मुदत ३० जूनला संपणार आहे. पंतप्रधानांकडे आणखी ३ महिने धान्य देण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली आहे. तसेच आता पावसाळा सुरू झाला आहे. हा पाऊस नव्या अंकुरांसोबत, आनंद घेऊन येतो. मात्र यासोबतच काही संकटंही घेऊन येतो. साथीचे आजार पसरत असतात. यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

यामध्ये बोलताना त्यांनी राज्यभरातील पंढरपूर वारी, गणपती उत्सव, दहीहंडी दिवाळी या उत्सवांमध्ये कोरोना व्हायरसमुळे वारीवरही यंदा विघ्न आलेय. नेहमी मोठ्या संख्येनं वारकरी वारीत सहभागी होतात. पण यंदा हा रम्य भक्तीसोहळा होणार नाही. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून विठूरायाचे दर्शन घ्यायला जाणार आहे. मी विठ्ठलाला हे संकट दूर व्हावं म्हणून साकडं घालणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यासोबतच पीपीई किट आणि मास्क यांचा मुबलक साठा, चेस द व्हायरस ही मुंबईत राबवलेली संकल्पना महाराष्ट्रभरात सुरू करण्यात येणार आहे. केंद्राकडून औषधांना परवानगी, रेमडेसीवीर सारखी औषधे उपलब्ध करुन देण्यात येतील. यासोबतच कोणत्याही औषधींचा आणि आवश्यक गोष्टींचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *