कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब मंजूर..
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल 

| ठाणे | करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी करोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.

करोना तपासणी लॅबची संख्या सध्या मर्यादित असून उपलब्ध लॅब्जवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत असून त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत आहेत.
त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते.

अशा प्रकारच्या लॅबसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन योजनेतून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी श्री. नार्वेकर यांनी मान्य केली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आता सदर लॅबचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *