दैनिक लोकशक्ती ऑनलाईन
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेटचे सामने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळेच होत नाहीत, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने गरळ ओकली. माजी कसोटीपटू शोएब अख्तरने करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी या दोन देशांमध्ये क्रिकेटचे मदतनिधी सामने व्हावेत असे मत व्यक्त केले होते, त्याला आफ्रिदीनेही समर्थन दिले आहे.
या दोन देशांत चांगले संबंध निर्माण व्हावेत, असे मोदी सरकारला वाटतच नाही. त्यांच्या याच नकारात्मकतेमुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील सामने होऊ शकत नाहीत. पाकिस्तान संघाला भारताशी सामने तसेच मालिका व्हाव्यात असे नेहमीच वाटते. पण अन्य मुद्दे पुढे करत हे सामने टाळले जातात. याला मोदी सरकारची नकारात्मकताच कारणीभूत आहे. दोन्ही देशांना क्रिकेटच जवळ आणेल, असा मला विश्वास आहे; पण मोदी सरकारने मानसिकता बदलली तरच हे सामने होतील, असे तारेही आफ्रिदीने तोडले आहेत.
पाकिस्तानातील हिंदूंना मदत करण्यासाठी पुढे आल्यानंतर खरेतर आफ्रिदीचे कौतुक झाले होते. त्यानेही काही दिवसांपूर्वी करोनाविरुद्ध केलेल्या उपाययोजनांबाबत मोदींचे जाहीर कौतुकही केले होते. मात्र, सुरवातीला चांगला हेतू ठेवत अखेर आपला खरा चेहरा समोर आणण्याची खोड आफ्रिदीने पुन्हा एकदा दाखवून दिली.