नगर मध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला कोरोनाची लागण

| नगर | अहमदनगर जिल्ह्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. संबंधित आमदाराच्या कुटुंबातील सदस्यांसह आरोग्य विभागातील सूत्रांकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, संबंधित आमदार हे जिल्ह्याच्या उत्तर भागातील एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होऊ लागला आहे. विशेष म्हणजे सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये एका आमदाराचा समावेश आहे. संबंधित आमदाराने स्वतःला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने क्वारंटाइन करून घेतले होते. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये त्यांचे स्त्राव नमुने तपासण्यात आले असून त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

संबंधित आमदार चार दिवसांपूर्वी आपल्या विविध मागण्यांचे एक निवेदन देण्यासाठी जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा होते. त्यातच संबंधित आमदारांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे हे पदाधिकारी व कार्यकर्ते टेन्शनमध्ये आले आहेत. तसेच संबंधीत कार्यालयाच्या आवारात संबंधित आमदारांना भेटलेले अधिकारी सुद्धा चिंतेत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५४४ झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३६९ आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५ मृत्यू झाले असून १६० जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *