भाजप युवा मोर्चाचे अभिनव आंदोलन, शरद पवारांना पाठवणार १० लाख ‘ जय श्रीराम ‘ लिहलेली पत्रे..!

| मुंबई | अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील निमंत्रण मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. या निमित्ताने श्रीराम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना या विषयात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याचा समाचार घेण्यासाठी शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर राज्यभरातून १० लाख पोस्टकार्ड ‘जय श्रीराम’ लिहून पाठवली जाणार आहेत. भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या अभियानाची घोषणा करत पनवेल येथील पोस्ट ऑफिसमधून पोस्टकार्ड शरद पवार यांना पाठवली आहेत.

राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असं वक्तव्य शरद पवार यांनी करणे म्हणजे फारच खेदजनक आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध केला आहे. समस्त प्रभू रामचंद्र भक्तांच्या भावना यानिमित्ताने तीव्र आहेत आणि म्हणूनच याविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठवावीत, असे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून तब्बल १० लाख पत्र शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. याची सुरुवात पनवेल येथील पोस्ट कार्यालयात जाऊन करण्यात आली.

रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कुणी बोलणार असेल तर प्रभू रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील. राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही. तर मग ज्यामुळे कोरोना जातो अशा किमान चार गोष्टी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारला शिकवाव्यात म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल, असं आवाहन भाजपा युवा मोर्चा कडून करण्यात आले आहे.

पत्रावर जय श्रीराम नाव असल्याचा मायन्यासह ही पत्रे पाठविण्यात येत आहेत. शरद पवार यांना आम्ही जाणीव करून द्यावी यासाठी हा पत्र प्रपंच आहे. राम जन्मभूमी हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. आमची ती आस्था आहे. भारतीय मानसिकतेचा तो भक्कम आधार आहे. हे सर्व माहित असताना फक्त राजकीय हेतु नजरेसमोर ठेवून अशी वक्तव्य आपण कशी करु शकता? असा सवाल भाजपा युवा मोर्च्याच्या प्रेरणा होणाराव यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी राजकारण विरहित होत याकडे पाहावे यासाठी आम्ही हा पत्र प्रपंच केला आहे. त्यांना लोकभावना लक्षात यावी हा या मागील उद्देश आहे, असं देखील युवा मोर्चा कडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *