ठाणे – कोरोना व्हायरस च्या वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई पुण्यासह संबंध महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी कर्मचारी , शिक्षक हे वेगवेगळ्या प्रकारची कामे करत आहेत. सर्वेक्षण, नोंदणी, प्रबोधन, व्यवस्थापन आदी अनेक ठिकाणी हे सर्वजण कंबर कसून आपले काम करत आहेत. कोरोनाचे संकट परतावून लावण्यासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र कष्ट करत आहेत.
ठाण्यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या सेवा आपत्कालीन परिस्थिती मुळे आरोग्य विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात वळविण्यात आलेल्या आहेत. ठाण्यातील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम दिले असून , मुंबई महापालिका, पुणे – पिंपरी चिंचवड महापालिका इथे देखील घरो घरी जावून सर्वेक्षण करण्याची कामे शिक्षकांकडे दिली आहेत. ग्रामीण भागात देखील कमिटी स्थापन झाली असून त्यांच्या मार्फत शिक्षकांसह इतर कर्मचारी काम करत आहेत.
या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विम्याची तरतूद इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सरकारी कर्मचारी , शिक्षक, कोरोना कमिटी सदस्य आदींना लागू करावी ही मागणी एक्का फाउंडेशन कडून करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी दिली आहे. देश, राज्य सध्या विपरित परिस्थितीतून जात असताना आपल्या जिवाला टांगणीला बांधून सरकारी कर्मचारी करत असलेल्या कामाला आमचा सलाम आहेच आणि त्यांचे आम्ही आभार देखील मानतो.. म्हणून त्यांना विमा कवच देणे गरजेचे आहे, ही मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.