सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करावा..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

| मुंबई | कोरोना सारख्या जागतिक महामारीची साथ असताना ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी व कामगार तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व स्टाफच्या सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने घोषित केल्याने, हे सर्व कर्मचारी कोरोना युद्धात आघाडीवर आहेत.

कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या अदृष्य विषाणू बरोबर लढा सुरू असून कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवताना अपु-या व निकृष्ट साहित्य सामग्री तसेच पीपीई किटची वानवा असतानाही कर्तव्यबुद्धीने कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आरोग्य यंत्रणेतील सर्व स्टाफ कोरोना बाधित होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणा-या अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांना त्यांच्या या अमुल्य योगदाना बद्दल राज्य शासनाने विमा कवच /सानुग्रह अनुदान देण्याची मागणी विविध कर्मचारी संघटनांनी केली होती.

 अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे आपली सेवा बजावताना जर दुर्दैवाने मृत्यू पावले तर आपले कुटुंबीय रस्त्यावर येऊ नये त्यासाठी विमा कवच व सानुग्रह अनुदानाची मागणी रास्तच होती. सेवा बजावताना जर मृत्यू झाला तर किमान आपल्या वारसांना तरी न्याय मिळेल ही शाश्वती कर्मचाऱ्यांना हवी होती म्हणून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यासाठी आग्रही होते.  शासनाने दि २९ रोजी शासन निर्णय देऊन ही विनंती मान्य केली आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना शासनाची अत्यंत आभारी आहे, असे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले.

याबरोबरच राज्य शासनाने कोरोना कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्ती देण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना अथवा तत्सम कारणाने जरी मृत्यू आला तरी त्याला विमा कवच व सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरवले पाहिजे अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना करित असल्याचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी स्पष्ट केले आहे, तसेच असा निर्णय तर शासनाने त्वरित घ्यावा जेणेकरून सर्वच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी हे आपली सेवा समर्पित भावनेने बजावतील, असे देखील ते म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *