अन्वयार्थ : अखेर स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी यांची समाधी पुनरुज्जीवित होणार..!

प्रस्तावना :
किल्ले राजगड पायथ्याला पाल खुर्द गावातील गुंजवणी नदी किनारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई साहेबांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम ट्रस्टच्या खासगी मालकीच्या जागेवर लवकरच श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाईसाहेब समाधी ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, सभापती विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. सदर समाधीचे आर्किटेक्चरल ड्रॉईंग, आर. सि .सी डिझाइन, प्लान व एस्टीमेट या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत.

स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी साहेब यांच्या संकल्पित समाधीची रेखाचित्रे पहावयास मिळाली आणि मनास उभारी मिळाली. एक शिवप्रेमी म्हणून आम्ही एक्का फाउंडेशनच्या टीमने त्या स्थळाला भेट दिली तेंव्हा मन विषण्ण अवस्थेत पोहोचलं होत.

 श्री राजा शिवछत्रपती यांना त्यांच्या ऐन उमेदीच्या, स्वराज्य ज्यावेळी बाळसं धरू लागलं होतं त्या काळात त्यांची अर्धांगिनी बनून सदैव त्यांना साथ देणाऱ्या आणि श्री राजा शंभू छत्रपती यांच्यासारखा ज्वलज्वलंतेजस पुत्र सह्याद्रीच्या कुशीत टाकणार्या वीर मातेच्या समाधीची अवस्था पाहून खिन्नता वाटली होती. आमच्यासहित अनेक दुर्गप्रेमी , इतिहासप्रेमी संघटना या समाधीचा यथोचित जीर्णोद्धार व्हावा यासाठी कार्यरत होत्या. श्रीमंत सईबाईसाहेब समाधी ट्रस्ट च्या वतीने आता हर काम सुरू होत आहे हे आनंदाची बाब आहे. 

दरम्यानच्या काळात श्री शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने असंख्य संकटांना तोंड देत सईबाईसाहेब यांच्या समाधी वर लोखंडी पत्र्याचे शेड करण्यात आले आणि उघड्यावर असलेली समाधी किमान सावलीत आल्याचे सुख शिवप्रेमींना मिळाले. उद्या तिथे यथोचित समाधी होईल यात शंका नाही पण श्री शिवशंभू प्रतिष्ठान यांनी केलेली पायाभरणी विसरता येणार नाही.

मावळातील शिवप्रेमी सर्वश्री महेशभाऊ कदम , नवनाथ भाऊ पायगुडे, स्वप्नील लिपाने, गणेश निगडे, सचिन खोपडे, संतोष झिपरे, बाप्पू साळुंखे , अक्षय मोडक, अक्षय सुतार तसेच शिवशंभू प्रतिष्ठाण व बारा मावळ परिवार या संघटनांच्या सदस्यांनी श्रमदान करून जी सावली स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी साहेब यांच्या समाधीवर धरली त्यासाठी समस्त शिवप्रेमी त्यांचे ऋणी राहतील. श्रीमंत सईबाईसाहेब यांच्या समाधीचा जीर्णोद्धार सुरू होण्यास राज्यात लागू असलेली प्रवासबंदी व मावळतला येऊ घातलेला पावसाळा अडथळा ठरत असले तरी पावसाळा संपताच जोमाने काम सुरू होईल अशी आशा धरूया.

प्रविण काळे, संपादक 

मान्यवरांच्या प्रतिक्रिया :

स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी साहेब यांच्या समाधीचा विषय सर्वच शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आहे. अनेक वर्षांपासून हा जीर्णोद्धार रखडलेल्या अवस्थेत आहे . प्रत्यक्ष काम सुरू होऊन यशस्वी रित्या पूर्ण व्हावे हीच अपेक्षा 

शैलशजी वरखडे, इतिहास व शिवचरित्र अभ्यासक

स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी साहेब यांच्या समाधी वर सावली करण्याचं कार्य शिवरायांच्या प्रेरणेने आमच्याकडून करून घेतलं . समाधीचा यथोचित जीर्णोद्धार व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे . त्यासाठी काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा व सहकार्य राहील.

– महेशभाऊ कदम, श्री शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज, महाराष्ट्र

1 Comment

  1. शिवशंभू प्रतिष्ठान व बारा मावळ परिवार 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *