अन्वयार्थ – भुकेचे लॉकडाऊन..!” कुणी आहे का घरात ? दार उघडा , माहिती द्या .” दुसऱ्यांदा दारावरची बेल दाबत आरोग्यरक्षक मॅडम नी हाक दिली . थोडयाशा नाराजीने आणि खूपशा भीतीने त्यांचा तो सूर लागला असावा . भर उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात ही वेशभूषा , फक्त डोळे उघडे म्हणजे चष्म्याच्या काचाआडच आणि डोक्यापासून पायापर्यंत कडक बंदोबस्त ! त्यात आज पहिला दिवस . ” किती वेळ लागतो यांना दरवाजा उघडायला ?” त्या हलकेच पुटपुटल्या. 

आतून दार उघडलं गेलं. ” कोण हवंय आपल्याला ? ” या प्रश्नापासून सुरू झालेला संवाद अखेरीस कुटुंबाची संपूर्ण माहिती देऊनच , ” तुम्ही पण काळजी घ्या. ” या त्या पंच्याहत्तरीच्या आजींच्या प्रेमळ सल्ल्याने संपला. मॅडम मजल दरमजल करीत त्या टोलेजंग इमारतीतील प्रत्येक घराची विचारपूस करून निघाल्या. समोरच्या दोन चाळीतील कुटुंबांचे सर्व्हेक्षण करून निघायचे असे मनाशी म्हणत त्या चाळीत पोहोचल्या.

आता हा दिनक्रम सलग किमान पंधरा दिवस चालणार होता. दोन चार दिवसात त्यांना सवय झाली. नाराजीचा सूर गळून पडला. लॉकडाऊनमुळे एक वेगळा अनुभव येत होता. त्यांच्या लक्षात आले, आपल्या येण्याची लहानथोर मंडळी नकळत वाट पाहू लागलीय. टोलेजंग इमारतीतील मंडळी सुद्धा बरोबर आपल्या यायच्या वेळेत दार उघडू लागली. परिसरातल्या सोसायटीत कुठे कोरोनाग्रस्त सापडले, कुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ? कुणाला कोरेन्टाईन केलं ? या सगळ्या गोष्टी म्हणजे ताज्या घडामोडींची माहिती मिळण्याचं विश्वसनीय चालत बोलत एकमेव वर्तमानपत्र म्हणजे या आरोग्यरक्षक. तसंच वयोवृद्ध आजी तर अगदी वाळवंटात हिरवळ दिसावी तशा मनातून खुश व्हायच्या. ऐंशीच्या घरातले आजोबा, कानपूर बंद. बोलणं कळत नव्हतं, अंथरुणावर पडून असायचे, त्यामुळे आजीचा त्यांच्याशी संवाद फक्त मूक अभिनयातून होत होता. मुलगा, सून, नातवंड अमेरिकेत स्थायिक झालेले. चार आठ दिवसातून फोनची रिंग वाजायची. तेंव्हा घडलेल्या संवादावर एक एक क्षण काढायचा, पुन्हा फोन वाजेपर्यंत! स्वयंपाकीण, मोलकरणी सगळे सद्ध्या आपापल्या घरी. आता त्यांची संवादाची भूक त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांत दिसत होती. खरं तर ते दोघे गेली कित्येक वर्षे सेल्फ कोरेन्टाईन होते. खिडकीतून दिसेल तेवढं जग पाहत होते. गार्डन मध्ये खेळणारी मुले, रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या गाड्या यांचे आवज कानावर येत असत, तेही लॉक डाऊन मुळे थंडावलेले. आताशा फक्त आणि फक्त महागड्या वस्तू, काहीही न बोलणारी भिंतींवरची सुंदर रंगीत चित्रे, गतकाळातील रम्य आठवणी हेच त्यांचे सोबती होते.

तिकडे चाळीत तर दहा बाय बाराच्या घरात एक मीटर अंतरावर म्हणजे किती दूर आणि ते कसे राहायचे हाच प्रश्न होता. त्यात हाताला काम नाही, घरात पाच सहा माणसं, वृध्द आजी आजोबा, लहान मुले पोटातली भूक मारायला पुन्हा पुन्हा पाणी पिऊन पेंगुळलेली असायची. गृहिणी चूल कशी पेटेल या विवंचनेत असलेली, तर करते पुरुष कोरड्या डोळ्यांनी शून्यात बघत बसलेले होते. सगळ्या घरातून भुकेचा राक्षस थयथयाट करत असलेला भासायचा. मॅडमना त्या जगातून या जगात यायला जरा वेळच लागला. त्या विचार करत्या झाल्या. आज जगाची दोन टोकं त्यांनी अनुभवली होती. कोरोनामुळे बंद दाराआडची अस्वस्थ संध्याकाळ भरदुपारी त्यांनी आज पाहिली होती आणि उगवणारी कोवळी सकाळ पाणी पिऊन पुन्हा निजतानाही भरदुपारी सताड उघड्या दारातून त्यांना दिसली होती. खरंतर दोन्हीकडे भुकेली माणसेच होती. फरक फक्त एवढाच होता , टोलेजंग इमारतीत मनाची भूक छळत होती तर झोपडीत पोटाची भूक जगणं कठीण करीत होती.

आरोग्यरक्षक मॅडमना ही विसंगती अस्वस्थ करत राहिली. त्या विचार करत राहिल्या, या भुकेला कोणी लॉकडाऊन करेल तर किती बरं होईल नाही ?
खरंच कोरोनामुळे लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे जगातली अशी वाळवंट, अशी बेटं, अशी महाकाय दुःख त्यांना दिसत होती. त्यांनी मनाशी ठरवलं, उद्यापासून दहा मिनिटं त्या आजींशी गप्पा मारण्यासाठी ठेवायची आणि येताना आपल्या परिसरातील एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या पाणी पिऊन पेंगुळणाऱ्या भुकेला सुद्धा लॉकडाऊन आपणच करायचे !

आता त्या अंगात दुप्पट बळ आल्यासारख्या भराभर चालत होत्या. एका नव्या उमेदीने त्या लॉकडाऊनवर मात करण्याचा विचार त्यांनी केला होता. कोरोनाला हरवायला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ उत्तम असणं हाच तर अर्धा विजय आहे. त्या तर खऱ्या अर्थाने उद्या नव्हे आजच विजयाच्या वाटेवर निघाल्या होत्या.

– सौ. नूतन बांदेकर ( लेखिका या व्यवसायाने शिक्षिका असून त्या काही दैनिकात स्तंभलेखन देखील करतात..)


27 Comments

 1. भूक लॉक डाऊन करायचा प्रयत्न करणाऱ्या त्या मॅडमना सलाम

 2. लेख खूपच छान ह्रदयाला भिडणारा आहे.

 3. अगदी तळमळीने लिहिला आहे लेख.फारच सुंदर

 4. खूपच छान आहे. स्वः तर अनुभवलेला.

 5. प्रत्यक्ष अनुभवातून लिहिले आहे .विचार करायलाच हवा.

  1. लेख आवडला.अत्यंत हृदय स्पर्शी वाटला. सामाजिक वास्तव मांडणारा आहे. कथेतील मॅडम प्रमाणे आपण सकारात्मक असलं पाहिजे असे वाटते.

 6. अतिशय सुक्ष्म निरीक्षणातून जमा झालेला अनुभव आणि त्यातून साकारलेली ही कथा.
  तरल आणि भावस्पर्शी.

 7. स्वानुभव आणि आंतरिक तळमळ … नमन 🙏

 8. लेख आवडला. अत्यंत हुदय स्पर्शी वाटला. सामाजिक वास्तव मांडणारा आहे. कथेतील मॅडम प्रमाणे आपण सकारात्मक असलं पाहिजे.

 9. या महामारीच्या काळातील मन आणि पोट या दोन्हीच्या भुकेचे वास्तव छान मांडले आहे

 10. मनाची व पोटाची भूक. खूप भावले. 2005 पुर परिस्थिती नंतर अनेक थरारक अनुभवांचे लेख येत. तसेच ह्या महामारी तील हा हेलवाणारा अनुभवाचे शब्दांकन खूप छान

 11. लॉकडाऊन झालेल्या प्रत्येकाला त्या माणसाच्या अवस्थेची व गरजा भागवणार-या संवेदनशील आरोग्यरक्षकांची नव्याने ओळख झाली.
  वास्तववादी कथा .खुप छान लिहीलय.

Leave a Reply

Your email address will not be published.