चर्चेतला विषय : दारूच्या दुकानावर गर्दीला शिस्त लावण्यासाठी शिक्षकांची नेमणूक
अन्वयार्थ : कुटील डाव नीट समजून घ्यायला हवा. शिक्षकांना निरनिराळ्या अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवायचे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खाली आणायची. पेशाची गरिमा एकदा नष्ट केली की शिक्षकांची विशिष्ट प्रतिमा तयार होते. समाजाच्या नजरेतून शिक्षक हळूहळू हळूहळू उतरत जातात…
संडास मोजणारे,
टमरेल मोजणारे,
उघड्यावर हागायला जाणारे मोजणारे,
समाजात प्रतिष्ठा नसलेले, शिक्षक ज्या शाळांमध्ये शिकवतात त्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालायला उन्नत गटातल्या पालकांना कमीपणा वाटेल.
खरे तर शिक्षक कोणी एक व्यक्ती नसते, ही एक मोठी संस्था असते. समाजात शिक्षकांच्या मताला आजही महत्त्वाचे स्थान आहे. उगीच का शाळांसाठी कोटी कोटीचा लोकसहभाग मिळू शकला? (लोकसहभागाच्या उदात्तीकरणाला विरोध आहे तो आहेच!) मात्र शिक्षकांनी केलेल्या कामाची ती पोचपावती होती, याचा विसर कोणाला पडू नये. तर मुद्दा हा आहे की काहीही कामं करायला सांगून ‘सांगकामे’ लेबल लावताना शिक्षक नावाच्या संस्थेची विश्वासार्हता नष्ट करायचा प्रयत्न सध्या ताकदीने होतोय.
कारण सरकारी शाळा सरकारांना नकोशा झालेल्या आहेत. कित्येक प्रकारची अशैक्षणिक कामे शिरावर घेऊन शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी झटत आहेत, वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम-प्रयोग करताय. सरकारी शाळा बंद करायच्या मार्गात शिक्षक हाच मोठा अडसर बनून उभे राहिले आहेत. असरसारखे रिपोर्ट पद्धतशीर वापरून, विविध माध्यमांतून शिक्षकांच्या प्रतिमेचे खलनायकीकरण करायचे जोरदार प्रयत्न झालेले आहेत. शिक्षकांनी ते प्रयत्न हाणून पाडताना अनेक आव्हाने परतवून लावली आहेत. पुन्हा फिनिक्स पक्षासारखी उभारी घेऊन शाळा बदलवल्या आहेत.
आंध्रप्रदेशात शिक्षकांना दिलेली ‘दारू ड्यूटी’ म्हणजे आणखीन एक निमित्त आहे. यापुढेही साखळीत एकेक करुन कडया जोडल्या जातील. प्रयत्न होत राहील. मात्र उत्तम शिक्षण देत आपल्याला आक्रमणाना सामोरे जावे लागेल. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ताकदीने काम करताना त्यासाठी अनुरूप धोरणांचा आग्रह धरत ही प्रासंगिक आक्रमणं थोपवायला शिक्षकांना संघर्ष करायला लागेल.
शाळाबंदी येतेय, तिच्या पावलांचा आवाज मला ऐकू येतो. गरीबांची मुले शिकली पाहिजेत, यासाठी देशातल्या शिक्षकांनी केवळ शिक्षक म्हणून वर्गात कार्यरत न राहता विविध आघाडयांवर स्वतःला सिद्ध करायला लागेल.
– भाऊ चासकर ( अतिथी संपादक)
न कळणार षडयंत्र लक्षात आलं या बातमीमुळे अतिशय अभ्यासपुर्ण लेख आहे
हा विचार करणार्यांना लाज वाटत नाही का जणांची नाही तर मनाची
भिकारी सरकारला टॅक्स मिळून देण्यासाठी शिक्षकांना नेमणारच !