#IPL: काल बुमराह, शमी , राहूल दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये का खेळायला आले नाहीत..? हा आहे नियम घ्या जाणून..

| मुंबई | सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. कालचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहिल. सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागल्यामुळे चाहत्यांना थरारक सामन्यांचा अनुभव घ्यायला मिळाला. दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात फक्त ५ धावा देत भेदक मारा केला. या षटकात बुमराहने २ बळीही मिळवले. त्यामुळे विजयासाठी अवघ्या ६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी चांगली संधी होती. परंतू अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित झाली.

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावा काढून दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले. मुंबईने ट्रेंट बोल्टला दुसरी सुपरओव्हर टाकण्याची संधी दिली. बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालने गेलचा कित्ता गिरवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सुपर ओव्हरच्या या थरारनाट्यानंतर कित्येकांच्या मनात लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी-कॉक, मोहम्मद शमी यांना दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये खेळण्याची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न पडला.

हे आहे त्याचे उत्तर :

सुपरओव्हबद्दल आयपीएलचे नियम स्पष्ट आहेत. नियमांप्रमाणे पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेले फलंदाज दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. ज्यामुळे क्विंटन डी-कॉक, लोकेश राहुल, निकोलस पूरन यांना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नाबाद होता परंतू फक्त २ धावा काढू शकल्यामुळे त्याने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पोलार्ड-पांड्याला संधी दिली. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांसाठी सुपर ओव्हरचा नियम आहे. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज हा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करु शकत नाही. ज्यामुळे बुमराह आणि शमीला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करता आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *