KDMC ची शून्य कचरा मोहीम..! वर्गीकरण करा नाहीतर गुन्हा दाखल..!

| कल्याण | केडीएमसीच्या वतीने २५ मे पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे. येथील पश्चिमेकडील नागरीकांची आधारवाडी डंपिंग ग्राउंडमुळे होणा-या त्रासातून सुटका करण्याच्या दृष्टीने ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे.  यात ओला आणि सूका कचरा एकत्रित उचलला जाणार नाही. कच-याचे वर्गीकरण बंधनकारक असून अन्यथा आवश्यकतेनुसार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील असे परिपत्रक आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यावतीने जारी करण्यात आले आहे. 

ओला कचरा या प्रकारात फळे, भाज्या यांचे टाकाऊ भाग, शिल्लक राहिलेले अन्न आदिंचा समावेश होतो. हा कचरा स्वतंत्र डस्टबीनमध्ये ठेवून तो देण्यात यावा अथवा सोसायटीमध्ये स्वतंत्र स्विकारण्याची व्यवस्था असलेल्या डस्टबिनमध्ये टाकावा. ओला कचरा कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधला जाणार नाही अथवा त्यामध्ये प्लास्टिक, कागद व अन्य कच-याचे घटक राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,  ओला कचरा दररोज उचलण्यात येईल. मात्र सूका कचरा बुधवार आणि रविवार या दिवशीच स्विकारण्यात येईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

सुका कचरा या प्रकारात कागद , पुठ्ठा, प्लास्टिक, प्लास्टिक बाटली, प्लास्टिक डब्बे, कापड, चप्पलं, टायर, फíनचर, गादया, केस, काच, रबर, धातू, ई-वेस्ट(इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, बॅटरीज, बल्ब, टयूब, कॉम्युटर, टी.व्ही आदीचे टाकाऊ भाग) व थर्माकोल, सिरॅमिक, फोम आदी प्रकारच्या कच-याचा समावेश होतो. परंतू यामध्ये प्लास्टिक व कागद या प्रकारा व्यतिरिक्त इतर प्रकारचा कचरा तुरळक प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे सुका कचरा घरामध्ये साठवून अथवा सोसायटीमध्ये वेगवेगळया गोणी अथवा डब्यामध्ये साठवून ठेऊन घंटागाडीमध्ये देण्याची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 महापालिकामार्फत कचरा उचलण्यासाठी येणा-या घंटागाडयांची वेळ निश्चित करण्यात आलेली असून त्यानुसार आपल्या विभागामध्ये घंटागाडीचा क्रमांक वाहन चालक, मुकादम, सॅनिटरी इन्सपेक्टर यांचे मोबाईल क्रमांकाचे फलक दर्शनी भागामध्ये लावण्यात येणार आहेत. 

तर गुन्हे दाखल होतील..

कचरा वर्गीकरण करुन न देणा-या,प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या विरोधात २५ मे नंतर महापालिकेमार्फत घनकचरा उपविधीनुसार कडक कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेही दाखल करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *