ऐका हो ऐका : पुढील आदेश येईपर्यंत ग्रामसभा स्थगित..!

| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे मे महिन्यात घेण्यात येणारी ग्रामसभा बंधनकारक असते. पण या संकटामुळे आता ग्रामसभा यंदा होणार नाहीत.  याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

 मात्र राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदांच्या निवडीसाठी आवश्यक असलेली, ग्रामपंचायतीची बैठक घ्यायला संमती दिली आहे.  या बैठका सर्व आवश्यक सूचनांचं पालन करुन घ्याव्यात, अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितले.

राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींच्या कामकाजात लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जातात.  प्रत्येक वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. या ग्रामसभा न घेतल्यास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. 

राज्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या काळात सर्व प्रकारचे मेळावे, कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली असून लोकांना अधिक संख्येने एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केल्यास होणाऱ्या गर्दीची स्थिती लक्षात घेता ती टाळण्यासाठी राज्यात ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात येत आहे.

 या पार्श्वभूमीवर मे महिन्यात बंधनकारक असलेल्या ग्रामसभेचे यंदा आयोजन करण्यात येऊ नये. तसेच पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणत्याही ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *