लॉक डाऊन पुन्हा वाढले..! २० एप्रिल नंतर काही ठिकाणी शिथिलता..!


  • २० एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल…!
  • अजुन काळजी घेण्याची गरज..!

मुंबई / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचवेळी देशातील काही भागात २० एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘२० एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल… मात्र त्यालाही काही नियम व अटी असतील,’ अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

‘आजपासून २० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत. सर्व गाव, तालुका, जिल्हे यांचं मुल्यांकन करणार…त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी किती काळजी घेतली हे तापसलं जाणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी असणाऱ्या भागात २० एप्रिलपासून शिथिलता आणण्याचा निर्णय गरिबांकडे बघून घेण्यात आला,’ असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत काही भागांत शिथिलता आणणार असल्याचं म्हटलं असलं तरीही एक इशाराही दिला आहे. ‘गरिबांसाठी, हातावर पोट असणाऱ्यांसाठी या लॉकडाऊनमध्ये २० एप्रिलनंतर सुरक्षितता असेल त्या ठिकाणी सवलत असेल. रब्बीची पीक काढणी सुरू आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. पण बेजबाबदारपणा केला तर सवलती काढून घेण्यात येतील,’ असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण देश ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना ३ मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, काही राज्यांनी आधीच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *