महाराष्ट्रात ‘ इथे ‘ सुरु झाले स्वतंत्र कोविड १९ रुग्णालय..!


मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिम भागातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आता कोव्हीड19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात आता केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवरच उपचार करण्यात येणार आहेत. एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. रुग्णालयात अन्य आजारांसाठी येणार्‍या रुग्णांना आता इतर रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

मिरा भाईंदर शहरात ‘कोरोना’ची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना आतापर्यंत मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत होते. मात्र आता रुग्णालयात ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांचे नमुने घेणे, ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचार करणे, त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवणे हे सोपस्कार टेंभा येथील रुग्णालयतच पार पडणार आहेत.रुग्णालयात कोरोना उपचारासाठी 100 बेड सज्ज करण्यात आले आहेत. रुग्णालयात सहा व्हेंटीलेटर यंत्रे आणि अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी आता केवळ कोरोनाबाधितांवरच उपचार केले जाणार आहेत. इतर रुग्णांना महापालिकेच्या मिरा रोड येथील रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येणार आहेत. गर्भवती महिलांच्या प्रसुतीचा खासगी रुग्णालयात होणारा खर्चही महापालिकेकडून दिला जाणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज शहरातील डॉक्टर संघटनांशी बैठका घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्याची मागणी केली. वरिष्ठ डॉक्टरांनी शहराला डॉक्टरांची आवश्यकता असून या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर पूर्णपणे सहकार्य करतील असे आश्वासन यावेळी दिले. महापालिकेच्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात महापालिकेच्या डॉक्टरांसोबतच एक खासगी डॉक्टर देखील तैनात केला जाणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *