महाराष्ट्र सरकार ठाम : अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीच..!

| मुंबई | कोविड १९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्यावर महाराष्ट्र सरकार ठाम आहे, असा पुनरुच्चार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केला.

सामंत यांनी गुरुवारी सिडनेहॅम महाविद्यालयात पत्रकार परिषद घेत परीक्षांसंदर्भात सरकारची भूमिका विशद केली. २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना स्पष्ट नव्हत्या. अन्यथा सरकारने परीक्षांची तयारी केली असती. ६ जुलै रोजी परत यूजीसीने नव्या मार्गदर्शक सूचना पाठवल्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला,’ असा आरोप त्यांनी केला.

परीक्षांचे राजकारण होत आहे. मात्र, सरकार विद्यार्थ्यांना संकटात ढकलणार नाही. सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो योग्य आहे, असे ते म्हणाले. परीक्षा घेण्याच्या विरोधात राज्यातील कुलगुरू आणि विद्यार्थी संघटना आहेत. बहुतांश विद्यार्थी गावी गेले आहेत. प्रश्नसंच कोण काढणार, जे विद्यार्थी प्रतिबंधित क्षेत्रात आहेत त्यांनी परीक्षा कशी द्यायची, उत्तरपत्रिका कोण तपासणार, पोलिस बंदोबस्त असे प्रश्न सरकारसमोर आहेत,’ असे ते म्हणाले. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून देशात हे राज्य रुग्णसंख्येच्या बाबतीत पहिल्या स्थानी असल्याने सरकार विशेष काळजी घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे.

उदय सामंत म्हणाले…

१. एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या सूत्रावर पास करण्याची समितीची शिफारस आहे.

२. राज्यातील ४१ महाविद्यालये आणि १९८ वसतिगृहे कोरोना संशयितांच्या विलगीकणासाठी अधिगृहीत आहेत.

३. परीक्षांचा जो गोंधळ आहे त्याचा फटका राज्यातील १४ सार्वजनिक अकृषी विद्यापीठांना बसला आहे.

४. ज्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत, त्यामध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे ७, ३४, ५१६, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे २,८३,९३७ विद्यार्थी आहेत.

५. यूजीसीने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे सुचवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *