महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती , असेच म्हणावे लागेल – सामना
सामनातून राऊतांनी भाजपला सोलपटले..!

| मुंबई | ‘ पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?’ असा सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाले. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ‘मोदी हे देशाचे भाग्यच! या चुका कशा दुरुस्त करणार?’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने’

‘मागील ७० वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या ६ वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे जरा वेगळे आहे. पंतप्रधान मोदी यांनी सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले आहे असे शहा म्हणतात. एकंदरीत असे दिसते की, आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे. त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही. महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले असे सांगितले जाते ते सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने आहेत’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

जेपी नड्डांना टोला

‘नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत, पण त्यांनी जे सांगितले ते हास्यास्पद आहे. कोरोनाचे संकट जागतिक आहे. मागच्या साठ वर्षांत ‘कोरोना’चे संकट नव्हते. त्यामुळे आजच्या इतकी व्हेंटिलेटर्सची गरज नव्हती, पण साठ वर्षांत ‘एम्स’सारख्या वैद्यकीय संस्था, लाखो डॉक्टर्स, सरकारी इस्पितळे, आयसीएमआरसारख्या संस्था निर्माण झाल्या. ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या प्रे. ट्रम्प यांनी दमदार आवाजात हिंदुस्थानकडे मागितल्या (कोरोनाशी लढण्यासाठी) त्या गोळ्यांचे उत्पादन इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरू झाले व त्याच आत्मनिर्भरतेतून देशात वैद्यकीय क्रांतीची बीजे रोवली हे कसे विसरता येईल? असा टोला नड्डा यांना लगावण्यात आला.

‘मोदींच्या कार्याचे कौतुकच, पण…’

‘मोदी यांनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या हे मान्य. कश्मिरातून ३७० कलम हटवले. तीन तलाक पद्धत बंद केली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यासंदर्भात निकाल दिला. हे सर्व मागच्या सहा वर्षात झाले व त्याबद्दल मोदी सरकारला श्रेय द्यावेच लागेल, पण १९७१ साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ‘फाळणी’चा सूड घेतला ही ऐतिहासिक चूक मानायची की, ऐतिहासिक कार्य? हे सुद्धा समजून घ्यावे लागेल. राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी कोसळलेल्या अर्थव्यवस्थेस गती दिली. म्हणूनच आजचा हिंदुस्थान उभा आहे’ अशी आठवणही सेनेनं भाजपला करून दिली.

‘सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय नाही’

‘ज्या ७० वर्षांतील उणीवा ६ वर्षांत दूर झाल्या त्या ७० वर्षांत अटल बिहारी वाजपेयी यांची साडे पाच वर्ष, विश्वनाथ प्रताप सिंग व चंद्रशेखर यांची मिळून दोनेक वर्ष व जनता पक्षाची सव्वा दोन वर्ष आहेत. हा कालखंड वाया गेला व फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल. वीर सावरकर यांचा अपमान करण्याची घोडचूक मागच्या साठ वर्षांत नक्कीच झाली, पण ही घोडचूक दुरुस्त करण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग गेल्या सहा वर्षांत स्वीकारला गेला नाही’ असा सवालही भाजपला विचारण्यात आला.

हे काही आत्मनिर्भर मजबूत असल्याचे लक्षण नाही’

‘नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेचे पानिपत झाले. गरिबी वाढली. रोजगार संपला. प्रत्येक चार माणसामागे आज एकजण बेकार आहे. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढून आणि विकून आर्थिक सुधारणांचा डांगोरा पिटला जात आहे. एअर इंडियासारख्या राष्ट्रीय कंपन्या कधीही जमिनीवर कोसळतील. कश्मिरातील तणाव ३७० हटवूनही संपलेला नाही. सिक्कीम आणि लडाखच्या सीमेवर चीनचे सैन्य आमच्या छाताडावर बंदुका ताणून उभे आहे. नेपाळसारखे मुंगीइतके राष्ट्र आमच्या भूभागावर हक्क सांगत आहे. हे काही आत्मनिर्भर मजबूत असल्याचे लक्षण नाही, अशी टीकाही सेनेनं भाजपवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *