साहेब, लोकांच्या पोटापाण्याचे बोला – खासदार संजय राऊत


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ढोल वाजवले गेले. आता दिवे लावायला सांगितल्यावर आग लावली नाही म्हणजे झालं, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावला. तसेच दिवा जळेलच, पण सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले ते सांगा, अशी मागणीही केली.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता. ५) रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतर राऊत यांनी मोदी यांच्या या आवाहनावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मोदींनी लोकांना जेव्हा टाळ्या वाजवायला सांगितले, तेव्हा लोकांनी रस्त्यावर जमा होऊन ढोल वाजवले. आता त्यांनी स्वतःच्या घरालाच आग लावली नाही म्हणजे झाले. साहेब कामाचे आणि लोकांच्या पोटापाण्याचे बोला.” असेही ते यावेळी म्हंटले.

मोदींच्या या आवाहनावर काँग्रेसनेही निशाण साधला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, ‘कोरोना विषाणूने थैमान घातले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे ‘इव्हेंट’ करून परिस्थितीचे गांभीर्य घालवत आहेत.’

काँग्रेसने आपल्या या ट्विटमध्ये एक हॅशटॅग वापरत मोदींनी देशापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.