| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या नियमानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जास्तीत जास्त सहा वेळा परीक्षा देता येणार आहे. तर अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मर्यादा नसणार आहे. परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय २०२१ वर्षामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे.
एमपीएससीने आपल्या पत्रकात म्हटले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारसी संदर्भात राबवण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियांमध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे, या संदर्भात खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे :
✓ खुला (अराखीव) उमेदवारांस कमाल ६ संधी उपलब्ध राहतील
✓ अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.
✓ उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल ९ संधी उपलब्ध राहतील.
उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू :
• उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.
• एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाईल.
• उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेची उपस्थिती संधी गणली जाईल.