NDA मधून अजुन एक मित्रपक्ष बाहेर, भाजपला धक्का..!

| नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र, पंजाब, बिहारपाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल, लोजपानंतर पश्चिम बंगालमधील भाजपचा सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चानं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून फरार असलेले जीजेएमचे अध्यक्ष बिमल गुरूंग यांनी आज ही घोषणा केली. बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणूक जीजेएम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत लढणार आहे.

बिमल गुरूंग म्हणाले, भाजपानं जी आश्वासन दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. पण ममता बॅनर्जी यांनी जी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण केली आहे. त्यामुळे मी एनडीएपासून दूर होऊ इच्छित आहे.

मी भाजपाशी असलेले संबंध तोडत आहे, असं सांगत गुरूंग यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत गोरखा जनमुक्ती मोर्चा तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवणार असून, त्यातून भाजपला ठोस प्रत्युत्तर देऊ. मला इतकंच सांगायचं आहे की, गोरखालँडची आमची मागणी अजूनही कायम आहे. आम्ही ही मागणी यापुढेही लावून धरू. हे आमचं ध्येय आहे. आमचं उद्दिष्ट आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ही मागणी स्वीकारणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ, अशी घोषणाही बिमल गुरूंग यांनी केली.

दरम्यान, मागील तीन वर्षांपासून फरार असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरूंग आज अचानक कोलकातामध्ये दिसून आले. फरार असलेले बिमल गुरूंग हे कोलकातातील सॉल्ट लेक परिसरातील गोरखा भवनाबाहेर दिसले. बाहेरील लोकांना प्रवेश बंदी असलेल्या गोरखा भवनात ते गेले. त्यानंतर बाहेर येत त्यांनी भाजपवर आरोप करत एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *