| नाशिक | नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. काल संध्याकाळी आलेल्या अहवालात ११ तर रात्री प्राप्त झालेल्या अहवालात ७१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल दिवसभरात मालेगावात ८२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात एका ३ महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश आहे तर पोलिसांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण २७६ बाधित असून त्यापैकी एकट्या मालेगावात २५३ कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता मिशन मालेगावची घोषणा केली आहे..
मिशन मालेगाव असे असेल…!
१. मिशन मालेगाव अंतर्गत मालेगावचे संपूर्ण सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला पोर्टेबल ऑक्सिमीटर दिले जाणार आहेत. त्यामुळे जिथल्या तिथे प्राथमिक तपासणी शक्य होणार आहे. ज्या रुग्णामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जाणार आहेत. पोर्टेबल एक्सरे चाचणी करणार असून त्याद्वारे न्यूमोनिया आढळून आला तरीही त्यावर उपचार केले जाणार आहेत.
२. २०० खाटांचं सरकारी रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांचे निदान देखील केले जाणार. कोरोनासाठी खाजगी रुग्णालयं अधिग्रहित केली आहेत. खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना इतर आजारांवर उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
३. नागरिकांच्या सुविधेसाठी हेल्पलाईन आणि मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे रूग्णांना जवळच्या दवाखान्याची माहिती मिळेल. त्यात तक्रार करण्याची सुविधा असेल. ज्यांना घरात शक्य आहे त्यांना घरात आणि इतरांना इस्टिट्युशनल क्वॉरंटाईन केले जाणार आहे.
असे अनेक उपाय केले जाणार असून मिशन मालेगाव यशस्वी करण्याचा निश्चय आरोग्यमंत्री टोपे यांनी केला आहे.