पनवेल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलेले आहे. अशा परस्थितीमध्ये सर्व राज्यात साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू झाला आहे. या कायद्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतदेखील कोरोना समिती स्थापन करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णाची अधिक माहिती घेण्यासाठी, आशा वर्कर्स सोबत शिक्षकाची नेमणूक करून पालिका हद्दीत सर्वेचे काम सुरू केले आहे. मात्र दोन दिवसांपासून काही शिक्षिका या कर्तव्यवर हजर राहत नसल्यामुळे अशा जवळपास ३६ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित करण्याचे आदेश पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे.
त्या संदर्भात आदेश मिळाल्यापासून काही शिक्षक वर्ग या कामावर रुजूदेखील झाल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या शिक्षिका काही कारणास्तव कामावर हजर राहत नसल्यामुळे, पालिका हद्दीतील कोरोनाजन्य परिस्थितीची माहिती राज्य सरकारकडे पाठवण्यात अनेक अडचणींचा सामना पालिकेला करावा लागत आहे. तसेच काही माहिती पाठवण्यास विलंबदेखील झाला आहे. अशा जवळपास ३६ हून अधिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना निलंबित करण्याची तयारी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरू केली आहे. त्या संदर्भात अशा शिक्षिकांना आज नोटीस बजावल्याची माहिती आहे.
राज्यात सध्या साथरोग रोगप्रतिबंधात्मक कायद्याची अमंलबजावणी सुरू केली आहे, त्या नुसार राज्यात सर्व शासकीय यंत्रणा देखील कामाला देखील लागल्या आहेत. अशा काळात कामात कामचुकार पणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे..