| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच व्हावं यासाठी मी वारंवार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होतो, पण ते थांबा, बघू बोलून विषय टाळत होते. मला त्यांची अडचण लक्षात आली की दिल्लीश्वरांसमोर ते काय बोलणार, मी कॅबिनेटमध्ये दोनदा हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, असा पलटवार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. हे सेवा केंद्र मुंबईतच रहावं यासाठी आपण काय केलं त्याची कागदपत्रे आपण उघड करू शकत देसाई यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
आपल्याकडे मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया यात मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाषणं झाली. आमची अपेक्षा होती की त्यांनी हा मुद्दा तिथे मांडावा. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावर मुंबईचा नैसर्गिक दावा आहे. हे मांडायला पाहिजे, तुम्ही ते मंजूर करून घ्यायला हवं, पण ते काही ब्र काढू शकले नाहीत, असा आरोप देसाई यांनी फडणवीस यांच्यावर केलाय. त्यांची अडचण समजू शकतो, त्यांच्या सर्वोच्च नेत्यासमोर ते काय बोलणार, असा खोचक टोलाही त्यानी लगावलाय.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेला बीकेसीमधला भूखंड बुलेट ट्रेनसाठी द्यायला मी विरोध केला होता. बुलेट ट्रेन स्टेशनसाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला पर्यायी जागा देईल, असं केंद्र सरकारला कळवा, तुम्ही हीच जागा मागू नका, असं केंद्र सरकारला कळवा हे मी सूचवलं होतं. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तसं केलं नसल्याचा गंभीर आरोपही देसाई यांनी केला आहे.
काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयएफएससी वरून महाविकास आघाडीला टार्गेट केले होते, परंतु कागदपत्र उघड करून माजी मुख्यमंत्री यांचा एका अर्थाने दिल्ली धार्जिनेपणा उघड करू असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेनेने दिले आहे. आता यावर फडणवीस काय बोलतात हे पाहणे औचित्याचे ठरेल..!