पंकजा मुंडे घरूनच करणार गोपीनाथ मुडेंना अभिवादन, जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला दिला मान..!

| बीड | लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी नियोजित परळीचा दौरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रद्द केला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी निर्णय घेतला. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच त्या अभिवादन करणार आहेत.

येत्या बुधवारी म्हणजे ३ जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात.  त्यानिमित्त बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. 

परळीत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे त्या दिवशी गोपीनाथगडावर जाणार आहेत. समर्थकांनाही त्यांनी आधीच घरी राहून स्मृतिदिन साजरा करण्याची सूचना दिली आहे.

गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नका, असा संदेश पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.

२ जून रोजी बाबा घरी पोटभर रस-पोळी खाऊन गेले होते. स्वतःच्या घरी तेच त्यांचं अखेरचं जेवण. ३ जून रोजी त्यांचे पार्थिव देखील घरी आणता आले नाही. त्यामुळे ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

असा करावा स्मृतिदिन साजरा

३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *