शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे तातडीने लक्ष द्या, शरद पवारांचे मोदींना पत्र..!

| मुंबई | कोरोना आणि लॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत अश्या आशयाचे पत्र शरद पवार यांनी मोदींना लिहले आहे. शेतकऱ्यांना वाचवा या आशयाचा मजकूर असलेलं एक पत्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.  २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत म्हणाव्या तशा काही ठोस तरतुदी नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याला अनुसरून त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. 

पत्रातील मुद्दे असे आहेत :

१) शेती क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी १.६३ लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं हा भाग २० लाख कोटींच्या पॅकेजचा विचार करता ८ टक्के इतका होता.

२) शेतीसंबंधीच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं. मात्र त्यासाठी लागणारा कालावाधी हा मोठा आहे. सध्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोना नावाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशात मागणी कमी झाली आहे, अडचणी येत आहेत त्याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

३) जे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे त्वरित मदत मिळणार नाही. ज्यांना तोटा सहन करावा लागला आहे त्या शेतकऱ्यांचं काय? लॉकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याचं काय? अशा काळात त्यांना त्वरित मदत देण्याची गरज आहे. खरिपाच्या दृष्टीने त्यांना नियोजन करता येईल यासाठी केंद्राने प्रयत्न केले पाहिजेत.

४) पशूपालन, मत्स्य व्यवसाय, लघु उद्योग, मधमाशी पालन यांच्यासाठी जे पॅकेज जाहीर करण्यात आलं त्याबाबत सरकारने अधिक स्पष्टता द्यावी.

५) सध्या कृषी क्षेत्रात काम करणारा प्रत्येक माणूस हा एक प्रकारच्या नैराश्याखाली जगतोय. तोटा सहन करुन नैराश्यात दिवस काढणाऱ्या शेतकऱ्याला त्वरित मदत देऊन दिलासा देण्याचं काम मोदी सरकारने केलं पाहिजे.

सध्या आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था ही कोरोना संकटामुळे आणि लॉकडाउनमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी विनंती मी आपल्याला पत्राद्वारे करतो आहे असंही शरद पवार यांनी आपल्या दीर्घ पत्रात मुद्देसूद म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *