व्यक्तिवेध : सामाजिक सुधारणांमधील महामेरू, राजर्षी शाहू महाराज…!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय तर महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महाराजांनी बहूजन समाज व त्यांच्या उद्धारासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रगण्य व्यक्ती म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. कोल्हापूर संस्थानात शिक्षणप्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक लोकशक्ती आपल्या वाचकांना देत आहे त्यांच्याविषयीची खास माहिती…

राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य…

मानवतेच्या दृष्टीने कलंक असलेली अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे असे शाहू महाराजांचे मत होते. वेगवेगळ्या सभा-समारंभात त्यांनी ते मत व्यक्त केले. केवळ बोलून आणि ठराव करून न थांबता त्याप्रमाणे आचरण करून अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य शाहू महाराजांनी केले आहे.

अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला..

अस्पृश्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळेल अशी व्यवस्था केली. १९०७ मध्ये कोल्हापूर येथे त्यांच्यासाठी ‘मिस क्लार्क वसतिगृह’ स्थापण केले. तेथे अस्पश्य विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मराठ्यांसाठी सुरु केलेल्या व्हिक्टोरीया वसतिगृहात अस्पृश्य व मुस्लीम मुद्यार्थ्यांची देखील सोय केली. १९१९ मध्ये अस्पृश्यांच्या शाळा बंद करून स्पृश्य विद्यार्थ्यांच्या शाळेत त्यांना समाविष्ट करण्याचा आदेश काढला. १८९९ च्या आदेशाने शाळेत शिक्षकानी अस्पृश्यता मानायची नाही. अस्पृश्यांना इतर मुलांप्रमाणेच वागवावे अशी आज्ञा केली. त्यामुळे अस्पृश्यांमध्ये शैक्षणिक प्रसार झाला. शाहू महाराजा गाधीवर आले, तेव्हा १८९४ साली संस्थानात अस्पृश्य समाजाची संख्या सुमारे १ लाख होती. त्यांच्या शिक्षणाची गरज शाहू महाराजांनी लक्षात घेतली आणि त्यासाठी त्यांनी पुढील धोराणांचा स्विकार केला.

अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत…

२५ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण संस्थेत मोफत व सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. ४ मार्च १९१८ रोजी त्याची अंमलबजावणी केली. शाहू महाराज सत्तेवर आले तेव्हा ५ अस्पृश्यांसाठी ५ शाळा होत्या. त्यांनी त्यात वाढ केली. १९१७ साली त्यांची संख्या २७ झाली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत दिली.

अस्पृश्यांना मराठे व ब्राम्हणांची आडनावे…

राजाराम हायस्कूल व कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तसेच अस्पृश्य विद्यार्थांना ५ रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली. दरबारात नोकर म्हणून अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. स्वत: शाहू महाराजांचे अंगरक्षक महार होते. जातीवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम हाती घेतला. अस्पृश्यांना मराठे व ब्राम्हणांची आडनावे दिली.

कोल्हापूरचे भवानी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले…

१६ ऑगस्ट १९१२ रोजी त्यांनी मागासलेल्या लोकांसाठी ५० टक्के जागा नोकरीत राखून ठेवण्याचे आदेश दिले. महार वतने कायद्याने १८१८ साली बंद झाले. गंगाराम कांबळे या व्यक्तीस हॉटेल चालवण्यास आर्थिक मदत केली. शिक्षण, आरोग्य आणि इतर खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा आदेश दिला. विटाळ मानने हे कायद्याने गुन्हा ठरवले. कोल्हापूरचे भवानी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. अस्पृश्य व स्पृश्य यांचीय सहभोजने घडवून आणली.

केवळ विचारच मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीही केली..

शाहू महाराजांनी अस्पृश्यांविषयी केवळ विचारच मांडले नाहीत. तर प्रत्यक्ष कृतीही केली. या जातीतील लोकांना समानतेचा अधिकार मिळावा त्यांचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न केले. निरनिराळ्या परिषदातून सामाजिक सुधारणा विषयी आपले विचार मांडले.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाकरता आणि मूकनायक वर्तमानपत्राच्या उभारणीमध्ये शाहू महाराजांनी स्वत:हून सहकार्य केले. केवळ समाज सुधारणेपुरता राज्यकारभार न करता शाहू महाराजांनी कला क्षेत्राला देखील राजाश्रय देत आपण संपूर्ण समाजाचे राजे असल्याचे सिद्ध केले. संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या कलांचा विकास आणि विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घडवला.
अश्या या थोर राजाने ६ मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला, त्या दिवशी संपूर्ण समाज जणू पोरका झाला. पण त्यांचे विचार आणि कार्ये मात्र नेहमीच आपल्या समाजाला प्रेरणा देत राहिले आहेत आणी यापुढेही देत राहतील हे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *