दिलेला शब्द न पाळणे आणि आश्वासन देऊन लोक झुलवत ठेवणे राजकारणातील या अलिखित नियमाला अपवाद असणारे निर्भीड,दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.
22 जुलै 1959 रोजी वडील अनंतराव व आई आशादेवी यांच्या पोटी अजित पवार यांनी जन्म घेतला. कमी वयातच अजितदादांचे पितृछत्र हरपले. पण राजकारणातील पितामह समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी कौटुंबिक पातळीवर याची उणीव त्यांना कधी भासू दिली नाही. लहानपणापासूनच त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात घेऊन शरद पवारांनी राजकारणातील त्यांची एन्ट्री निश्चित केली. छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी आजतागायत मागे वळून पाहिले नाही. महाराष्ट्राने अनेक दादा पाहिले पण अजितदादा सर्वात उठून दिसतात ते त्यांच्या कर्तृत्वाने. माशाच्या पिलाला पोहायला आणि गरुडाच्या पिलाला झेप घ्यायला शिकवावं लागत नाही ते त्यांच्यात उपजतच असतं हे अजितदादांनी दाखवून दिले.
बघतो ,करतो ,सांगतो हे शब्द दादांच्या शब्दकोशात नाहीत. जे पोटात तेच ओठात असा स्वभाव असणारे अजितदादा अनेकांना फटकळ वाटतात पण त्याहून कित्येकांना ते आवडतात ते त्यांच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे. खंबीर नेता, उत्तम प्रशासक, कुशल संघटक, कडक शिस्तीचे अजितदादा प्रश्न कोणताही असो त्याच्या मुळापर्यंत जाऊन तो सोडवणे हा त्यांचा स्वभाव. कोणतेही काम करताना ते उत्तम दर्जाचे झाले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास संबंधितांना तिथल्या तिथे समज दादा समज देतात आणि चांगलं काम करणाऱ्या च्या पाठीशी खंबीर उभाही राहतात. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो, कामाचा प्रचंड व्याप आपल्या रोखठोक पद्धतीने झपाझप सोडवत अजितदादा जास्तीत जास्त लोकांना आपला कसा उपयोग होईल याचा विचार करतात. वेळेला महत्व, शब्दांचा पक्का, पर्यावरणप्रेमी, उत्तम सौंदर्यदृष्टी असणारे अजितदादा जितके खंबीर तितकेच हळवेसुदधा आहेत.
आपल्या मतदारसंघात निवडून येण्यासाठी जीवाचे रान करणारे अनेक नेते आहेत पण प्रचाराचा नारळ फोडून केवळ 1 सांगता सभा घेऊन विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणारे केवळ अजितदादाच आहेत.याचे कारण अगदी सोपे आहे अजितदादा यांचे काम बोलते आपल्या मतदारसंघात केलेली कामे बोलतात. विकासकामे असतील तर जातीधर्माची, अथवा कोणत्याही भावनिक मुद्द्यांची हवा काढून घेता येते अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बारामतीचा जो चोफेर विकास केला आहे तो खुद्द मोदींनाही मान्य करावा लागला आहे. बारामती पिंपरी चिंचवड यांचा विकास पाहता स्मार्ट सिटीचे खरे जनक अजितदादाच आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रशासनावर उत्तम पकड असली की कामे नेटाने होतात सामान्य माणसाला सोयीसुविधा अधिक सक्षमपणे पुरवता येतात हे अजितदादांनी आपल्या नेतृत्वाने अनेकदा दाखवून दिले आहे. जनतेसाठी जनता दरबार भरवून लोकप्रतिनिधीचा अर्थ काय असतो हे त्यांच्या कार्यशैलीतून अनुभवता येतो.पोपटपंची करत वेळ घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करून क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे आपल्या प्रत्येक कृतीतून ते दाखवत असतात. रात्री कितीही उशिरा झोपले तरी सकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत ते उपलब्ध असतात.
कृषी, सहकार, शिक्षण, औद्योगिक, क्रीडा, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात अजितदादांचे मोठे योगदान आहे. सध्या प्रसिद्धीसाठी सबकुछ जमाना असलेल्या युगात अनेक मोठमोठी कामे करणारे अजितदादा प्रसिद्धीला पद्धतशीर टाळतात. काम हीच त्यांची ओळख आहे. राजकारणात केवळ डोकं असून चालत नाही तर आपल्या मागे डोकीसुद्धा असावी लागतात हे पुरते ओळखलेल्या अजितदादांनी पायाला भिंगरी बांधत व बेरजेचे राजकारण करत महाराष्ट्रभर स्वतंत्र कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्षाला सक्षम करण्यात मोठं योगदान दिले आहे.
अजितदादा जसे एखाद्याला सांगून निवडून आणतात तसे ते सांगून पाडतात हे उदाहरण त्यांनी पुरंदरच्या विजय शिवतारे यांना आस्मान दाखवत आपले राजकीय कसब दाखवून दिले.
गेल्या 3 दशकांच्या आपल्या प्रवासात दादांनी अनेक चढउतार पाहिले. आपल्या ग्रामीण ढंगात बोलण्याच्या पद्धतीने बोलता बोलता एक सभेत त्यांनी ओघात केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले व त्याची राजकीय जबर किंमत ही त्यांना मोजावी लागली. त्याच बरोबर कथित सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी अजितदादा यांना खिंडीत पकडत त्यांच्या वेगवान राजकीय कारकिर्दीला ब्रेक लावला पण याला न जुमानता अत्यंत खंबीरपणे त्यांनी हा कसोटीचा काळ समजून धीरोदात्तपणे सामोरे गेले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची प्रचंड पडझड झाली असताना शरद पवार यांच्यासोबत अत्यंत खंबीरपणे त्यांनी पक्ष सांभाळण्यासाठी जीवाचे रान केले व हरलेला सामना पुन्हा खेचून आणण्यात मोठं योगदान दिले पण महाघाडीच्या भिजत घोंगड्यावर नाराजी व्यक्त करत अचानक त्यांनी घेतलेला शपथविधी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला आणि राजकारणात काहीही होऊ शकतं याची प्रचिती महाराष्ट्राला आली. यामुळे पवार कुटुंबाने आजपर्यंत टाळलेला विसंवाद महाराष्ट्राने पाहिला यामागे नेमकं कारण काय? खरोखरच अजितदादा यांची नाराजी की शरद पवार यांची खेळी हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
कोणतीही व्यक्ती म्हटलं की त्याला दोन बाजू असतातच. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नाव आपल्या नेतृत्वकौशल्याने त्यांनी राजकारणातील अनेक पदे मिळवली. आपल्या रोखठोकशैलीने अनेक अडलेले प्रकल्प , रखडलेली कामे इच्छाशक्ती असली की चुटकीसरशी सोडवता येतात हे दाखवून दिले. राजकारण हे केवळ पैसा कमावण्याचे व प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नाही तर ते जनतेच्या कल्याणाचे महत्वाचे अंग आहे हे ते जाणतात. त्यांचा कामाचा आवाका, उत्तम संघटनकौशल्य, कडक शिस्त, राजकारणावर असलेली पकड पाहता ते मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार आहेत पण येणारा काळच त्याचे उत्तर देईल. राजकारणात बोले तैसा चाले हे शब्द जपणाऱ्या रोखठोक, दमदार नेत्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
– विनोद खटके, बारामती
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .