व्यक्तिवेध : हिमालयाएवढ्या उंच पित्याची प्रतिभा समर्थपणे प्रवाहित ठेवणारी गंगा – सुप्रिया सुळे..!

सध्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांची दुसरी पिढी व तिसरी पिढी आपले नशीब आजमावत आहे. आपल्या राजकीय परंपरेचा जास्तीत जास्त आधार घेऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत परंतु या सर्वांमध्ये आपल्या राजकीय परंपरेचा कमीत कमी आधार घेत आपल्या उपजत गुणांच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रियाताई सुळे उठून दिसतात. पवार घराणे महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकीय घराणे समजले जाते. पवार कुटुंब नेहमीच महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वडील शरद पवार यांचा सुप्रिया यांना अभिमान जरूर आहे पण गर्व अजिबात नाही वडिलांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने जपला आहे. 

समाजातील अनेक गरजू हुशार गरीब मागास व आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी सुप्रियाताई झटत असतात. तेही प्रसिद्धीला पद्धतशीरपणे टाळून..! अलीकडे समाजकारण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांची महाराष्ट्रात कमतरता नाही. परंतु कोणताही बोलबाला न करता आपल्या सामाजिक कार्याचा वसा त्या पुढे नेत आहेत. सुरुवातीला राज्यसभेवर निवड झाल्यानंतर अल्पावधीतच आपल्या अभ्यासूपणाची छाप त्यांनी राज्यसभेत पाडली यानंतर २००९ साली व २०१४, २०१९ साली त्या बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून गेल्या. 

तसा बारामती हा पवारांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून संपूर्ण देशाला परिचित आहे. या मतदार संघाचे मोठय़ा ताकतीने नेतृत्व करणाऱ्या सुप्रियाताई यांनी हा मतदारसंघ विकासाचे मॉडेल ठरेल या दृष्टीने विविध प्रयत्न केले आहेत. करत आहेत. लोकसभेत प्रत्येक विषय अत्यंत अभ्यासूपणे मांडल्याने व तो तडीस जाईपर्यंत पाठपुरावा केल्यामुळे त्या अधिक उठून दिसतात. अत्यंत साधी राहणी आणि सौम्य भाषा शैली हे त्यांचे विशेष आहेत. शैक्षणिक धोरणे, तरुणांचे, शेतकऱ्यांचे, मजुरांचे व महिलांचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी कणखर भूमिका घेऊन सोडवले देखील आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कामांसाठी मोठा निधी त्या खर्च करत असतात. नुकताच त्यांनी वयोश्री योजनेच्या माध्यमातून श्रवणयंत्रे वाटपाचा विक्रम केला आहे. कोणत्याही मुलीला शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये म्हणून ग्रामीण भागातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या सायकल मोफत वाटल्या आहेत. स्वतःची खाजगी शैक्षणिक संस्था असतानाही जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने जाऊन त्यांच्या भावविश्वाची चाचपणी करणाऱ्या त्यांच्या गुणवत्तेसाठी व भौतिक सोयी सुविधांसाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी क्वचितच आहेत. त्यातील ताई एक..!

समाजकार्याला झोकून देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या पाठीशी त्या गंभीर पणे उभ्या राहून अनाथांना साथ देणाऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या कार्याला हत्तीचं बळ त्यांनी दिले आहे. तरुणांचे देशातील स्थान ओळखून त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शनाद्वारे नव आयुष्याची कवाडे त्यांनी खुली करून दिली आहेत. महिला सबलीकरण हा तर शारदा बाईंपासून सुप्रियाताई पर्यंत सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. महिलांच्या कर्तृत्वाला अवकाश प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक महिलांना हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे.

अल्पावधीतच आपल्या मेहनत जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्त्रीभ्रूण हत्येला चटावलेल्या व दगडी काळीज बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील काही नराधमांना सुप्रियाताईंनी केलेल्या जागृतीने चांगलीच चपराक दिली आहे. जन्माला येण्याआधीच जगाला पारख्या झालेल्या निष्पाप जीवांच्या हत्येचा डाग पुरोगामी महाराष्ट्रात अधिकच गडद होत चालला असताना, कोवळ्या कळ्यांना मृत्यूच्या खाईतून परत आणण्यासाठी बेटी बचावच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य नक्कीच मोठे आहे.  विशेष म्हणजे आपल्या कर्तृत्वाने त्यांनी मोठी उंची गाठली असली तरी सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे त्यांचे पाय नेहमीच मातीला बिलगलेले असतात. 

ताईंचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

– विनोद अशोक खटके, बारामती

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *