व्यक्तिवेध : खरे लोकनेते गोपीनाथराव मुंडे..!

अस म्हणतात की नेतृत्व हे काळाच्या विविध पटलावर खरे उतरणारे असावे. लोकांशी नाळ जुळलेले आणि जनतेची अचुक नस पकडून त्यांच्या उत्थानासाठी काम करणारे नेतृत्व क्वचितच; त्यातीलचं एक होते गोपीनाथ मुंडे…. लोकनेते मुंडे साहेब.

 मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रणरणत्या उन्हात तापणारा , पाण्यासाठी सतत भटकंती करणारा, कोरड्या हवेतही गारवा पेरणारा आणि अन्यायाविरुद्ध भिडणारा प्रदेश. दुष्काळ पाचवीला पुजलेला असताना मराठवाड्याने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रत्ने दिले, त्यातीलचं एक म्हणजे गोपीनाथ पांडूरंग मुंडे. (Gopinath Munde)

संघर्षमय प्रवास

बीड जिल्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी मुंडे साहेबांचा जन्म झाला. कुठल्याही प्रकारच्या राजकारणाशी संबंध नसलेल्या परिवारात जन्म झालेल्या मुंडे साहेबांचे बालपणीचे शिक्षण गावातचं जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे अंबेजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. आई वडील दोघेही विठ्ठलाचे भक्त, सोबत चं भगवानबाबा च्या कीर्तनासाठी मुलाला घेवून जात असल्यामुळे मुंडे साहेबांवर आध्यात्माचा फार प्रभाव पडला. वडीलांच्या अकस्मात मृत्युनंतर मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी आपल्या लहान भावाला बळ दिले. महाविद्यालयीन शिक्षण आटोपून पदवीच्या शिक्षणासाठी ते पुणे येथे गेले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव असणारे व त्याचे कार्य करणारे प्रमोद महाजन यांच्याशी मुंडे साहेबांचा परिचय झाला आणि याचे रूपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीसोबतचं प्रमोद महाजन यांची विचारधारा मुंडे साहेबांना पटली आणि पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

या दोन्ही मित्रांचा प्रवास मग सोबत चं सुरू झाला आणि त्याचा श्रीगणेशा झाला तो बीड जिल्हातुनचं. पहिले जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचा बीड पासून सुरू झालेला प्रचार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वदुर झाला. मिळेल त्या परिस्थितीत पक्षाचा प्रचार करून पक्षाच्या विचारधारेला जनसामान्यांत रुजविण्याचे काम मुंडे साहेबांनी केले.  शेटजी_भटजीचा पक्ष अशी असेलली ओळख पुसून काढून ओबीसी समाजातील विविध घटकांना सोबतीला घेवून माधव हा नवा पॅटर्न महाराष्ट्रात उभारला आणि तो यशस्वी ही करून दाखविला. ओबीसींची पक्षाशी मोट बांधून आणि सोबतीला एकनाथ खडसे, पाडुंरग फुंडकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. 

१९७८ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढविली ती जिल्हा परिषद ची आणि राज्यातून सर्वात जास्त मताने मुंडे साहेब निवडून आले. १९८० मध्ये रेणापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा आमदार झाले. पुढे १९९५ च्या निवडणूकांमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घालविला. ती निवडणूक गाजली ती बाळासाहेबांच्या आणि मुंडे साहेबांच्या भाषणांनी आणि याचा परिणाम म्हणजे २८८ पैकी १३८ जागा युतीला मिळाल्या आणि कॉंग्रेस पक्षास फक्त ८० जागांवर समाधान मानावे लागले. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री आणि उर्जामंत्री ही महत्वाची खाते मुंडे साहेबांनी गाजविली.

ओबीसींच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा, उसतोड कामगारांसाठी आवाज उठविणारा युवा आक्रमक चेहरा ते राज्यातील लोकांचे, सामान्यांचे प्रश्न तडफेने मांडणारा आमदार व पुढे राज्याचा उपमुख्यमंत्री असा प्रवास, हे फक्त मुंडे साहेबांनी केलेली अपार मेहनत आणि त्यात लोकांचा कमावलेला विश्वास यालाचं जाते.

दो हंसो का जोडा

स्व. विलासराव देशमुख आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से बरेच प्रसिद्ध आहेत. विलासराव कॉंग्रेस मध्ये तर मुंडे साहेब बीजेपी मध्ये पण तरीसुद्धा दोघांमध्ये अतुट मैत्री होती. एकमेकांचा पक्ष वाढवित असताना, सोबत विरोधात संघर्ष करीत असताना सुद्धा ही दो हंसो की जोडी मात्र महाराष्ट्र नव्हे तर देशात नेहमीचं चर्चेचा विषय राहीली आहे.

तरूण नेतृत्व ते लोकनेता

प्रारंभीच्या काळापासून ज्या पक्षाला कोठेही स्थान नव्हते, त्या पक्षाला आणि विचारधारेला महाराष्ट्रामध्ये सत्तास्थानापर्यंत नेण्यात मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रातील *माधव* प्रयोग असो की ओबीसी समाजाला पक्षाशी बांधून नवे नेतृत्व निर्माण करण्याचे काम असो,मुंडे साहेबांनी सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांचे अनुयायी आणि कार्यकर्ते अनेकदा त्यांच्या उदारपणाचे अनेक किस्से सांगतात. त्यात अगदी सामान्यातील सामान्याने केलेला फोन उचलून त्याची समस्या लगेच सोडविण्याचे अनेक प्रसंग कार्यकर्ते सांगतात. तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संबंध आणि त्याच्या सुखदुःखात सहभागी होवून ही नाळ घट्ट झाली होती. पक्ष विस्तारासाठी केलेले कार्य आणि त्यातुन लोकांचा नेता अशी झालेली प्रचिती यातून भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०१० मध्ये पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे साहेबांना लोकनेते म्हणून संबोधले. खर्या अर्थाने लोकांच्या, सामान्यांच्या नेत्याला त्यांनी केलेल्या संघर्षाला मिळालेली ही पोचपावतीचं होती….

२०१४ ची निवडणूक आणि अंतिम प्रवास…

२०१४ ची लोकसभा निवडणुक भारतीय राजकारणात मैलाचा दगड ठरली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पुर्ण बहुमतासह सत्तास्थानापर्यंत पोहचला होता. सततचा संघर्ष करून आपल्या पक्षाचा पंतप्रधान आणि त्यातून जनतेची सेवा करण्याची अपार संधी यान्वये प्राप्त ठरणार होती. २०१४ ची महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक ही मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेण्याचा निर्णय ही झाला होता;परंतु काळाच्या मनात काही वेगळेच होते. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातचं आजच्याच दिवशी ०३ जुन २०१४ ला दिल्ली येथे रस्ते अपघातात मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाले आणि चार दशकांचा हा प्रवास कायमचा अचानक थांबला…..

महाराष्ट्राचे पोरकेपण..

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक नेतृत्वांचा हातभार आहे. शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार ते विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र सक्षमपणे सांभाळला. यामध्ये विरोधी ते सत्तास्थानापर्यंत झालेला मुंडे साहेबांचा प्रवास नवमहाराष्ट्राला उभारी देणारा ठरला. परंतु काळाला हे मान्य नव्हते.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली होती त्यात हिंदुह्रुदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने ती अजुन मोठी झाली. महाराष्ट्राला मिळालेल्या या पाठोपाठच्या धक्क्याने सावरत असतानाचं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अकाली अपघाती निधनाने ओबीसी, बहुजन चळवळीतला लोकनेता हरविला…

अस म्हणतात की एक दिवस मरण सर्वांनाच येणार आहे परंतु ६ वर्षा अगोदर आजच्याच दिवशी अपघाती निधनात हा लोकनेत्याला गमविणे हे सत्य आजही महाराष्ट्राला पचविणे मात्र फार कठीण जात आहे.

स्मृतीदिनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन…

आशुतोष चौधरी, वरिष्ठ संपादक

4 Comments

  1. देव्हाऱ्यातील देवाप्रमाणे पुजला जाणारा देव.. मुंडे साहेब

  2. देवत्व प्राप्त होणारा एकमेव नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबा

  3. आशुतोष… खूप जबरदस्त मांडणी मित्रा

  4. आशुतोष… खूप जबरदस्त मांडणी मित्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *