काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता..?

| मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच काही महत्वाची बदल होण्याची चिन्ह आहेत.  नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदी आणलं जाण्याच्या तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस वर्तुळात या बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  दोन दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीवारी वर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही हेच कारण असल्याचं कळतंय.

विधानसभा अध्यक्ष निवडीला अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही.  परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळात महसूल मंत्रीही आहेत. शिवाय काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त केलं जाऊ शकतं. 

दरम्यान नाना पटोले हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत त्यामुळे विदर्भात काँग्रेस भाजपला टक्कर देत आहे. तसेच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात. ते मूळचे काँग्रेसचे, पण २०१४ला ते भाजपच्या तिकीटावर खासदार झाले. पण भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे देशातले पहिले खासदार ठरले होते.

नाना पटोलेंच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. मागच्या वेळीसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे आता ते ही ऑफर स्वीकारतात का याची उत्सुकता आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वूभूमीवर हे बदल होतात की हे संकट संपल्यानंतर हे होते, हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *