अन्वयार्थ : स्वतःला जिवंत माणूस समजत असाल तर “हरवलेली माणसं” हे पुस्तक नक्की वाचा..

भान हरवलेल्या समाजाला भानावर आणण्याचे काम दादासाहेब थेटे सर आणि त्यांचे समाजभान बांधव भान हरपुन करत आहेत…. कुपमंडुक बणलेल्या माणसातील माणुसकीला ढुसण्या मारण्याचं काम दादासाहेबांचं नुकतच प्रकाशित झालेलं पुस्तक ” हरवलेली माणसं ” करत रहातं… एखादं पुस्तक मनोरंजना बरोबरच ज्ञानवृध्दीचं काम करतं, पण त्याही पुढे जात दादासाहेबांचं हे पुस्तक “पोथी पढे पढे सो भया न पंडित कोय | ढाई आखर प्रेमका पढेसो पंडित होय” या संत कबीरांच्या उक्तीला खरं उतरतं.  स्वतः ते ‘मी टू’ च्या जानकीच्या संदर्भाने  म्हणतात “प्रेमाची भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे… माणुसकीतुन जुळल्यालं नातं हे मनाच्या खोल कुठे तरी रूतुन बसतं ” …. आणि याचाच प्रत्यय “हरवलेली माणसं” वाचतांना वेळोवेळी येत रहातो…

“हरवलेली माणसं” म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाच्या गाठोडीतील 24 कॅरेट शुध्दतेचा आविष्कार होय…. हे पुस्तक म्हणजे या दशकातील स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या माणसांच्या भोंगळ आणि पशुतुल्य अप्पलपोटी स्वभावाचा दाहक दस्तावेज होय… इथे तुमच्या साहित्य कृतिला श्रृंगारीक बनवणारे साहित्त्यीक वांझोटे होत कुठे तरी एखादा आडोसा शोधत पडुन रहातात…. कारण हे पुस्तक म्हणजे माणुस नावाच्या प्राणी समुहाचे उघड्या डोळ्यांनी पाहिलेले शवविच्छेदन…. संवेदनशील व्यक्ती हे पुस्तक वाचल्याचं समाधान तर सोडाच त्या दिवसाचं जेवण आणि झोप ही हरवुन बसतो… हे पुस्तक वाचतांना आपण अस्वस्थ होत शिळा होवुन पडलेल्या असंख्य आहिल्या दादासाहेब आणि समाजभानच्या हातुन जीवंत होतांना पहात रहातो…. पुस्तकातील प्रत्येक पानागणीक आपण ही ‘ मृगजळी ‘, ‘ मी वेश्या ‘, ‘ मी टू ‘ ची जानकी,  ‘ काखेखालच्या गोचीडातील ‘ दहा वर्षाची ती अभागी कळी जिला तिचा सख्खा मामाच ओरबडतो, ‘ अभागी संघर्षातील ‘ एड्सच्या भ्रमापाई माय-लेकिंना छळणारा समाज,  ‘ पिकलं पान ‘ मधील रूक्मिणबाई, ‘ माऊली ‘ मधील अंध शांताबाई,  ‘ तो आणि ती ‘ मधील नवऱ्यामुळे  एचआयव्ही बाधित झालेली आई आणि मुलगा,  ‘ पिसाळलेली जनावरं ‘ मधील अत्याचार ग्रस्त बालिका… असे कितीतरी अभागी जीवांचे प्रतिबिंब आपण ही आपल्या सभोवताली शोधत रहातो..

माणुस नावाच्या प्राण्याला समाजशील समजल्या जातं… (कोरोनाच्या महामारीत एकाकी पडलेले असंख्य भेदरलेले  जीव आपण याच देही याची डोळा पाहिले आहेत.) आज घडीला समाज ही आहे, माणुस ही आहे आणि त्यातील प्राणी नावाचा पशु ही जशास तसाच आहे,  अभाव आहे तो फक्त त्यातील शीलाचा… निर्जीव पाण्यावर ही खडा पडला तर त्यावरही तरंग निर्माण होतात, पण आपण सभोवताली घडणाऱ्या घटनांनी विचलित न होता हरीण गिळलेल्या अजगरा सारखे निपचीत पडुन आहोत… ‘हरवलेला माणुस’ मधील जालुच्या संदर्भातील बघ्यांच्या बाबतीत काढल्याले दादासाहेबांचे उदगार आपल्या बाबतीत ही सत्य वाटु लागतात- “मारणारा ह्रदय शून्य होता हे जरी खरं असलं, तरी मार खातांना पाहणारेही पाषाण ह्रदयी नव्हते का  ? ” या ‘का’ चा प्रवास स्वतःला माणुस म्हणवनाऱ्या आम्हा-तुम्हा सर्वांपासी येवुन थांबतो….. या पाषाण ह्रदयी माणसांमध्ये हे पुस्तक वाचतांना आपण प्रत्येक पानावरती स्वतःला शोधु लागतो. डुक्करा सारखं जगुन.. उठायचं, खायचं, लेकरं पैदा करत एक दिवस मरुन जायचं… या परिघात अडकल्यानं आपलं जगणं ‘ हरवलेली माणसं ‘ वाचतांना अस्वस्थ होतं..! आपल्यातील माणुसकी अद्याप ही मेलेली नसेल तर आपली आपल्यालाच लाज वाटु लागते.  दादासाहेब आणि समाजभान बांधवांसारखी माणसं त्यांना ही तुमच्या-आमच्या सारखी जगण्याची भ्रांत आहे… कुटुंब-कबीला..  लेकरं-बाळं.. हे सारं त्यांना ही आहे.  ‘जिंदगी वसुल’ म्हणत त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या सुखाच्या समिधा माणसांच्या कोंढाळ्यात माणुसपण हिरावुन घेतलेल्या अभागी जीवांना त्यांचं हरवल्यालं माणुसपण बहाल करण्याकरीता त्या सेवाकुंडामध्ये समर्पित केल्या आणि  करत आहेत… मग आपणच का गांडुळासारखं भुमिगत होवुन फक्त खाललेल्या वस्तुंचं खत करत आहोत  ? या विचारांच्या काहुरात विझलेल्या मेणबत्त्या, हरवलेली लोकशाही- भाग एक, दोन, तीन करत पूरग्रस्तांच्या वेदना पासुन ते कोरोनाच्या भुकमरी पर्यंत… आम्ही समाजभान म्हणत एका दिव्याने हजारो दिवे पेटवन्याची उर्मी असलेल्या दादासाहेब थेटे सरांच्या सेवा समर्पनापर्यंत येत पुस्तक हाता वेगळं करतो..

येणाऱ्या काळात साहित्याची जातकुळी पाहुन दिल्या जाणारे किती पुरस्कार या पुस्तकाला मिळतील सांगता येत नाही. कारण साहित्याची कथा,कादंबरी, ललित या सर्वच साहित्य परिघांना छेद देत ‘हरवलेली माणसं’ हे पुस्तक जाणते-अजाणते पणे एक समाज म्हनुन आपणच आपल्या हाताने ओरबडलेल्या अभागी जीवांची  दुःख गाथा मांडत जातं…. कारण त्यांचा हेतू प्रांजळ आहे. “आम्हाला भेटलेले जालु, कैलु, कृष्णा, दत्ता,  मुनीरचाचा, हरी, भानु, सोन्याबापु, रूस्तुम आबा, सोहेल तुम्हाला ही या समाजाने अडगळीत टाकलेल्या आवस्थेत कुठे तरी भेटतील, त्यांच समाजानं हिरावुन घेतलेलं माणुसपण पुन्हा मिळवुन द्या.” आणि मला वाटतं हाच समाजभान आणि दादासाहेबांच्या लेखी सर्वोत्तम पुरस्कार ठरेल…! जेंव्हा माणुसपण हरवलेला मनोरूग्न कैलु समाजभानच्या प्रयत्नातुन बरा होवुन स्वतःच्या डिस्चार्ज पेपरवर स्वतःची सही करतो तेंव्हा एक वाचक म्हणून आपला उर फुटायला येतो. आपल्यातील गेंड्याची कातडी पांघरून गाड झोपी गेलेल्या समाजभानाला हे पुस्तक पेटतं करतं. माझं तर सोडाच, पण ज्यांच्या माथ्यावर वाचन म्हंटलं की आढ्या पडतात त्या माझ्या कुटूंबातील इतर सदस्यांची कथा तर वेगळीच…. मी जेंव्हा त्यांना म्हणालो ” शिवाजी महाराजांची शपथ ! या पुस्तकातील शब्द-नि-शब्द खरा असुन माझे मित्र थेटे सर यांच्या स्वानुभवातील हे बावनकशी  सोनं आहे ”  काय चमत्कार म्हणावा हे पुस्तक वाचण्याकरीता आधाशासारखी झुंबड उडाली… मृगजळी पासुनचा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आणि डोळ्यातील पाणी पाहुन मला दादासाहेब आणि त्यांच्या समाजभान बांधवांचा हेवा वाटला.. ( हेवा या करीता, कारण मी ही अंबडकरच जि.जालना… B.A. ला असतांना 1999 ते 2001 या काळात आम्ही ही अंबड परिसरातील गोविंदपुर तांड्यावरील अभागी सरसी चव्हाणला आधार देत तिची परवड थांबवण्याचा प्रयत्न केला… पण आमच्या पाठीवरील बिऱ्हाडामुळं त्याचं दादासाहेब आणि समाजभान सारखं चळवळीत रूपांतर करता आलं नाही.)

दादासाहेब तुम्ही आणि समाजभान बांधव जे काम करत आहात त्याची स्तुती करावी ऐवढी योग्यता ही आम्हाला माणुस म्हणुन आद्याप  मिळवता आलेली नाही. संत कबीरांच्या जात कुळीतील तुम्ही सर्व- ” ।। मोको कहाँ धुंडे रे बंदे, मै तो तेरे पास में | ना मैं देवल ना मैं मजित, ना काबे कैलास में | कहत कबीरा सुनभाई साधो, सब सासो ही सास में ||” संत कबीरांच्या माणसांच्या श्वासा मध्ये वसलेल्या खऱ्या खुऱ्या ईश्वराच्या शोधाचा आपला  प्रवास निरंतर बहरत राहो … शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर आम्ही जो सशक्त व व्यसनमुक्त बलशाली भारता करीता बाल संस्काराचा जागर करत आहोत,  त्यातुन कही पुण्यकर्म आमच्या गाठी जमा झाले असेल तर त्याचे ही बळ आपल्या समाजभान प्रवासास लाभो ही सदिच्छा व्यक्त करत माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. 

|| जय शिवराय ||

– प्रा.डाॅ.गजानन महाराज वाव्हळ, पुणे ( राष्ट्रीय शिवकीर्तनकार) , मुख्य प्रवर्तक  : शिव विचार जागर अभियान, महाराष्ट्र राज्य 

टिप :- सदरील पुस्तक अमेझाॅन वर उपलब्ध आहे. पुस्तका करीता त्यांचा संपर्क- 9764042323, 9834080286 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *