अभिनव संकल्प : खड्डयाचा फोटो पाठवा, २४ तासात तो बुजवणार BMC..!

| मुंबई | कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारा कोरोना रोखण्यात पालिका यशस्वी होत असताना पावसाळापूर्व कामेही वेगाने केली जात आहेत. शिवाय पावसाळ्यात खड्डे पडल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अभिनव संकल्पनाही राबवत आहे. यामध्ये मुंबईकरांनी खड्डय़ाचा पह्टो पाठवल्यास हा खड्डा केवळ 24 तासांत बुजवला जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

मुंबईत पावसाळ्यात पडणाऱया खड्डय़ांमुळे मुंबईकरांकडून पालिकेवर नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मजबूत रस्ते बनवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये या वर्षी पहिल्यांदाच रस्त्याच्या मटेरियलमध्ये प्लॅस्टिकचा वापर करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार कामही सुरू झाले आहे. शिवाय जास्तीत जास्त रस्ते सिमेंट-काँक्रीटचे बनवण्याकडे लक्ष दिले जात आहे. सर्व 24 वॉर्डमध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. यानुसार खड्डय़ांपासून सुटका मिळवण्यासाठी नवे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अशी करा तक्रार

आपल्या विभागात पडलेल्या खड्डय़ाचे फोटो पालिकेला ट्विटर किंवा ‘मायबीएमसी’ वेबसाईटवर पाठवता येणार आहेत. तक्रार नोंदवल्यानंतर 24 तासांच्या आत संबंधित खड्डा पालिकेच्या माध्यमातून बुजवला जाईल. येत्या पावसाळ्यापासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कोल्डमिक्सने भरपावसात खड्डे बुजवता येणार

पालिकेच्या वरळी अस्फाल्ट प्लाण्टमध्ये कोल्डमिक्स बनवण्याचे काम करण्यात येत आहे. या वर्षी दोन हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन करण्यात येणार आहे. या कोल्डमिक्सच्या सहाय्याने भरपावसातही खड्डे बुजवता येणार आहेत.

यातील 630 मेट्रिक टनांहून जास्त कोल्डमिक्सचे उत्पादन करण्यात आले असून 270 मेट्रिक टनांहून जास्त कोल्डमिक्स 24 विभागांत वितरीतही करण्यात आले आहे. गरजेनुसार त्या त्या विभागांना कोल्डमिक्स देण्यात येणार असल्याची माहिती रस्ते-पूल-वाहतूक प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *